‘ रम्मी-जिम्मी ’ ची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:10 AM2021-10-15T01:10:58+5:302021-10-15T01:12:49+5:30
वृद्ध भूधारकाच्या खुनाचा कट रचून त्याचा काटा काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या रम्मी परमजितसिंग राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट - १ च्या पथकाने मागील आठवड्यात परराज्यांमधून अटक केली होती. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी (दि. १४) पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
नाशिक : एका वृद्ध भूधारकाच्या खुनाचा कट रचून त्याचा काटा काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या रम्मी परमजितसिंग राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट - १ च्या पथकाने मागील आठवड्यात परराज्यांमधून अटक केली होती. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी (दि. १४) पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आनंदवली येथील मळे परिसरात १७ फेब्रुवारी रोजी रमेश मंडलिक यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून संशयित रम्मी, जिम्मी हे दोघेही पोलिसांना गुंगारा देत होते. रम्मी यास न्यायालयाने ही फरार घोषित केल्याने पोलिसांकडून त्याच्या संपत्तीवरही टाच आणण्यास सुरुवात केली. पोलिसांचे पथक रम्मी-जिम्मीच्या मागावर होते मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे पथकाने सर्वप्रथम उत्तराखंडमधून ताब्यात घेतले तसेच रम्मी यास हिमाचल प्रदेशाच्या एका जंगलातून अटक करण्यात आली. रम्मी याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या गुन्ह्यात माेक्कानुसार कारवाई केली आहे.
पोलिसांनी या दोघांना पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्याने गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयापुढे उभे केले. यावेळी सरकारी पक्षाकडून पोलीस कोठडीच्या मुदतीत वाढ करण्यात यावी असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत रम्मी, जिम्मी यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
--इन्फो--
घरांची झडती, आर्थिक व्यवहारांची तपासणी
पोलिसांनी या दोघा बंधूंच्या घरांची झडती घेतली आहे. तसेच त्यांचे आर्थिक व्यवहाराच्या नोंदीही तपासल्या असून त्यांच्या संपर्कात कोण, कोण होते याबाबत माहिती घेतली आहे. तसेच या गुन्ह्यातील संशयित जगदिश मंडलिक याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याची माहिती सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी दिली.
--