चौकीदाराच्या पगारात घर चालवून दाखवा : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:45 AM2019-04-01T01:45:32+5:302019-04-01T01:46:00+5:30
मै चौकीदार हुँ, मै चायवाला हुँ असे म्हणून चौकीदार आणि चायवाल्याची विटंबना मोदी सरकारने सुरू केली असून, चौकीदाराला जितका पगार मिळतो तेवढा पगार घ्या आणि घर चालवून दाखवा, असे खुले आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:ला ‘मै चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना दिले आहे.
नाशिक : मै चौकीदार हुँ, मै चायवाला हुँ असे म्हणून चौकीदार आणि चायवाल्याची विटंबना मोदी सरकारने सुरू केली असून, चौकीदाराला जितका पगार मिळतो तेवढा पगार घ्या आणि घर चालवून दाखवा, असे खुले आव्हान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:ला ‘मै चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्यांना दिले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकरोड व पंचवटी येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या निवडणुकीत मनुस्मृतीला विरोध करून डॉ. आंबेडकरांनी दिलेली घटना वाचविण्यासाठी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार डॉ. प्रताप वाघ, माजी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात भुजबळ यांनी मोदी सरकारवरही तोफ डागली. ते म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास अद्यापही होत नाही, मग तुम्ही करतात काय? असा सवाल करून, उच्च न्यायालयाने फडणवीस यांना चांगलेच फटकारल्याने या सरकारने या प्रकरणी नाकर्तेपणाची जबाबदारी स्वीकारून सत्तापदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र देवेंद्र फडणवीस गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिटकून राहत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.