मांजरीच्यामागे धावत बिबट्या पत्र्यावर चढला अन् थेट घरात पडला; डरकाळ्यांनी रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला
By अझहर शेख | Published: August 11, 2022 08:02 PM2022-08-11T20:02:19+5:302022-08-11T20:03:00+5:30
leopard in Nashik: नाशिक येथील भगूर गावापासून पुढे असलेल्या लहवीत शिवारात गुरुवारी (दि.११) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा बिबट्या मांजरीच्या शिकारीकरिता घरावर चढला; मात्र त्याचे वजन व धावण्यामुळे पत्रा तुटला अन् बिबट्या थेट स्वयंपाकघरात कोसळला.
- अझहर शेख
नाशिक - येथील भगूर गावापासून पुढे असलेल्या लहवीत शिवारात गुरुवारी (दि.११) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा बिबट्या मांजरीच्या शिकारीकरिता घरावर चढला; मात्र त्याचे वजन व धावण्यामुळे पत्रा तुटला अन् बिबट्या थेट स्वयंपाकघरात कोसळला. यावेळी झालेला आवाज अन् बिबट्याने फोडलेल्या डरकाळ्यांनी गाढ झोपलेले रहिवासी खडबडून जागे झाले. सुदैवाने या घटनेत बिबट्याने रहिवाशांपैकी कोणालाही जखमी केले नाही. त्यामुळे वनखात्यासह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक शहरासह आजूबाजूच्या गावांचा परिसर जणू बिबट्यांचा मूळ अधिवास बनत चालला आहे. नाशिककरांना बिबट्या लोकवस्तीत अथवा त्याच्याकडून कधी पशुधनावर, तर कधी मानवी हल्ले तसे नवीन राहिलेले नाही; मात्र दारणाकाठालगत असलेल्या लहवीत गावाच्या शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेली घटना यापेक्षा ‘हटके’ अशीच आहे. आतापर्यंत बिबट्या असा घरात कोसळल्याची घटना यापूर्वी नाशिकमध्ये घडलेली नाही, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
शुभम बाळू गायकवाड यांचे लहवीत गावात पत्र्याचे घर आहेत. घरात त्यांच्यासह तीन महिला तीन लहान मुले असे सात सदस्य मध्यरात्री गाढ झोपेत होते. यावेळी पत्र्यावर मोठा आवाज झाला अन् स्वयंपाक घरात अचानकपणे पावसाचे पाणी येऊ लागले. यामुळे सर्व सदस्य जागे झाले. त्यांनी घरातील दिवे सुरू केले अन् नजरेसमोर आला तो दबा धरून बसलेला बिबट्या. त्याच्या गुरगुरण्याने व डरकाळीने रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
रहिवाशांकडून माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे रेस्क्यू पथकासह पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. वनपाल, वनरक्षकांनी घराभोवती जाळ्या लावून विजेऱ्यांच्या प्रकाशात पाहणी केली असता घरात बिबट्या आढळला नाही. तो पुन्हा तुटलेल्या पत्र्याच्या ठिकाणाहून वर येऊन लगतच्या लष्करी हद्दीतील जंगलात पळाला.