पूरग्रस्तांची पंचनाम्यासाठी धावाधाव

By admin | Published: August 21, 2016 01:53 AM2016-08-21T01:53:57+5:302016-08-21T02:06:34+5:30

विमा कंपनीकडून नुकसानभरपाई : यंत्रणेवर दबाव

Running for Panchnama of flood victims | पूरग्रस्तांची पंचनाम्यासाठी धावाधाव

पूरग्रस्तांची पंचनाम्यासाठी धावाधाव

Next

नाशिक : सलग चोवीस तास धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे शहरातील गोदावरीसह नासर्डी, वाघाडी नदीला आलेल्या पुराचे दुकानांमध्ये पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व्यावसायिकांची तीन आठवड्यानंतरही धावाधाव सुरू असून, आजवर आठशेहून अधिक पंचनामे करण्यात आले असले तरी, दररोज किमान दहा ते पंधरा व्यावसायिकांचे अर्ज तहसील कार्यालयात येऊन धडकत आहेत.
दि. २ आॅगस्ट रोजी नाशिकसह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली, गंगापूर धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर गोदावरीला येऊन मिळणारे नालेही दुथडी भरून वाहिले, नासर्डी व वाघाडी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहिल्याने गोदावरीनेही रौद्ररूप धारण केले. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या, तर शहरातील सराफ बाजार, कापडबाजार, हुंडीवाला लेन, दिल्ली दरवाजा, बालाजी कोट आदि व्यावसायिक ठिकाणीही गोदावरीचे पाणी शिरले. साधारणत: कंबरे एवढे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. पाण्यात भिजलेल्या मालाचे नंतर सेल लावून कमी किमतीत व्यावसायिकांनी विक्री केली असली तरी, अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या मालाचा विमा काढला असल्याने कंपनीकडे नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी शासकीय यंत्रणेने केलेला पंचनामा त्यासाठी आवश्यक आहे, परंतु शासकीय यंत्रणेने अगोदर नदीकाठच्या रहिवाशांच्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य दिले, सलग आठ ते दहा दिवस जवळपास साडेतीन हजार कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले, त्यात झालेले नुकसान, घराचा वर्ग आदि बाबी नमूद करण्यात आल्या. त्यानंतर मात्र व्यावसायिकदार, दुकानदारांनी आपल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूल खात्याकडे तगादा लावायला सुरुवात केली आहे. आजवर आठशेहून अधिक दुकानदारांचे पंचनामे करण्यात आले असून, तरीही दररोज दहा ते पंधरा दुकानदारांचे तहसील कार्यालयात अर्ज येऊन धडकत आहे. विमा कंपन्या नुकसानभरपाईच्या दाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा पंचनामा ग्राह्य धरत आहेत, त्यामुळे पंचनाम्यासाठी महसूल यंत्रणेवर दबाव वाढला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Running for Panchnama of flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.