अखेरच्या महासभेसाठी धावपळ
By admin | Published: December 29, 2016 01:00 AM2016-12-29T01:00:15+5:302016-12-29T01:00:29+5:30
कामांसाठी पाठपुरावा : केवळ मंजुरीसाठी प्रयत्न
नाशिक : आर्थिक अडचणींमुळे महापालिकेच्या वतीने आर्थिक तरतूद होणे शक्य नाही, हे ज्ञात असतानाही विविध नागरी कामांसाठी नगरसेवक पाठपुरावा करीत असून, येत्या शुक्रवारी (दि.३०) होणाऱ्या अंतिम महासभेत आपल्या प्रभागातील प्रशासकीय कामाचा पाठपुरावा व्हावा यासाठी धावपळ सुरू आहे.
महापालिकेला जकात आणि एलबीटी रद्द झाल्यानंतर अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम शहरातील नागरी कामांवर झाला आहे. तरीही नगरसेवकांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केल्यानंतर अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर सोडवण्यात आला आहे आणि १९२ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, अनेक प्रभागातील कामे अजूनही प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नागरी कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा यापूर्वी प्रभागात धडाका सुरू होता, तसा यंदा होताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे अनेक कामांचे प्रशासकीय प्रस्तावच तयार नाहीत. किमान निवडणुकीच्या तोंडावर आपल्या भागातील कामे मंजूर झाली आहे, हे दाखविण्यासाठी तरी प्रशासकीय प्रस्ताव महासभेवर यावेत, यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)