‘स्वच्छ शहर’ प्रतिसादासाठी महापालिकेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:04 AM2019-01-23T00:04:32+5:302019-01-23T00:05:16+5:30
शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे.
नाशिक : शहरात केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पथक येण्यापूर्वी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असताना मालेगावच्या तुलनेत नाशिक शहर मागे पडल्याचे चित्र आहे. मालेगावमध्ये नऊशेहून अधिक नागरिकांनी प्रतिसादासाठी कॉल केले असताना नाशिकमध्ये मात्र अवघे साडेसहाशेच नागरिक जागरूक ठरले आहेत. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छ शहरासाठी केंद्र शासनाकडे प्रतिसाद नोंदविला आहे.
केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहरांसाठी अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत देशभरातील शहरात स्पर्धा घेतली जाते. शहरात अस्वच्छतेची ठिकाणे कमीत कमी व्हावा, घनकचरा व्यवस्थापनाचा अधिकाधिक वापर व्हावा, सार्वजनिक शौचालये स्वच्छ असावीत तसेच त्याचप्रमाणे घरगुती कचऱ्याचेदेखील वर्गीकरण व्हावे हा या मागील शासनाचा उद्देश असतो. महापालिका त्यादृष्टीने प्रयत्न करीत असतात. परंतु तरीही याबाबत स्थानिक नागरिकांना कितपत माहिती आहे, तसेच त्यांचे स्वच्छतेबाबत ज्ञान किती याचादेखील आढावा घेण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने नागरिकांचा प्रतिसाद घेतला जातो.
यासंदर्भात प्रत्यक्ष पथक शहरात दाखल झाल्यानंतर ते तर नागरिकांशी चर्चा करतेच, परंतु १९६९ हा टोल फ्री क्रमांक असून, त्यातूनही नागरिकांनी फोन करून प्रतिसाद नोंदवायचा असतो. परतुं त्यात नाशिक शहरातील नागरिक कमी पडत आहेत. मालेगाव येथील नागरिकांनी केलेले कॉल हे नऊशेहून अधिक आहेत. मात्र, नाशिक महापालिकेसंदर्भातील केवळ साडेसहाशे कॉल्सच झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी असा द्यावा प्रतिसाद
महापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भात प्रतिसाद देण्यासाठी नागरिकांनी १०६९ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तो फोन कट होतो आणि त्यांनतर पुन्हा कॉल येतो, त्यावर विचारण्यात येणाºया प्रश्नांसाठी पर्याय दिला जातो व त्यानुसार प्रतिसाद दिल्यानंतर नोंद केली जाते. फोन करणाºया व्यक्तीची व्यक्तिगत माहिती घेऊन ती संकलित केली जाते. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिसाद कमीच त्रास अधिक
महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी प्रयत्न केले जात असून, विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुलभ शौचालयत आरसे, पेपर नॅपकीनदेखील ठेवण्यात आले आहेत. मात्र तेदेखील चोरीस जात असल्याने महापालिकेची अडचण अधिकच वाढली आहे.