कंत्राटी वाहनचालकांची वेतनासाठी धावपळ
By admin | Published: September 16, 2015 11:15 PM2015-09-16T23:15:31+5:302015-09-16T23:16:11+5:30
कंत्राटी वाहनचालकांची वेतनासाठी धावपळ
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी वाहन चालकांची मानधनावर भरती करण्यात आली असून या कंत्राटी वाहनचालकांना गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांनी बुधवारी (दि. १६) जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची भेट घेऊन वेतन तत्काळ मिळण्याची मागणी
केली.
यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनही केले आहे. या कंत्राटी वाहनचालकांची भरती बीव्हीजी व लोकसेवा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था या कंपनीमार्फत करण्यात आली आहे.
या कंत्राटी वाहनचालकांची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरविण्यात येते. लोकसेवामार्फत मानधन १० हजार ६९५ रुपये व बीव्हीजीमार्फत १४ हजार ६२५ रुपये न देता बीव्हीजीतर्फे ६००० रुपये देण्यात येतात. तर लोकसेवामार्फत ६५०० रुपये देण्यात येतात. शासन पातळीवरून निघणारे अनुदानच या कंत्राटी वाहनाचालकांना देण्यात यावे,अशी मागणी या कंत्राटी वाहनचालकांनी केली आहे. कंंत्राटी वाहनचालकांसोबत सीटूचे राजू देसले होते. या शिष्टमंडळाने सुरुवातीला अध्यक्ष विजयश्री चुंभळे व नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. (प्रतिनिधी)