वाईन विक्रीच्या निर्णयाला रुपाली चाकणकर यांचे समर्थन, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 03:24 PM2022-02-08T15:24:41+5:302022-02-08T15:25:19+5:30
Rupali Chakankar News: राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे या वाईन विक्रीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करू नये, अशी मागणीदेखील राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही
जळगाव - राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे या वाईन विक्रीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करू नये, अशी मागणीदेखील राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही, अशा शब्दात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
रूपाली चाकणकर या ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १ हजारपेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातदेखील ४० बालविवाह रोखले गेले आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी बालविवाहांची संख्या खूपच जास्त आहे. तसेच काही ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्यांनी मुलींचे वय जास्त दाखवले आहे. अशा वाढत्या बालविवाहाच्या घटनांमुळे महाराष्ट्र २० ते २५ वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे कुठेही बालविवाह होत असेल, तर त्याला उपस्थित राहणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करावे, तसेच नोंदणी अधिकारी चुकीचे जास्त वय नोंदवत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महिला आयोगाने मागणी केली असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.
महिलांच्या समुपदेशनसाठी जळगाव जिल्ह्यात चार केंद्र आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात न जाता अनेकांचे संसार वाचले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वन स्टॉप सेंटर आहे. मात्र फक्त जळगाव जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर नाही. हे आशादीप वसतिगृहात प्रस्तावित आहे. त्यासाठी जागादेखील जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती असावी, ज्या कार्यालयांमध्ये ही समिती नाही, त्या कार्यालयांना ५० हजार रुपये दंड आणि कंपनीची नोंदणी तात्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. ही समिती नसेल, तर लैंगिक अत्याचारापासून महिलांना संरक्षण मिळत नाही, असेही त्या म्हणाल्या. शक्ती विधेयक लवकरच कायद्यात रूपांतरित होईल, याबाबत सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. महिलांवर अनेकदा राजकीय पुढारी टिपणी करतात. ही टिपणी करू नये, असेही त्यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यांचा हा राजकीय द्वेष
अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रहदारी संदर्भात जी काही वक्तव्ये केली आहेत. त्यात त्यांचा राजकीय द्वेष दिसून येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कुठं आणि कसं व्यक्त व्हावं, हे महत्त्वाचं आहे. आपल्या विचारांतून संस्कार आणि संस्कृती दिसते, ते महाराष्ट्र पाहतोय, असे सांगत यावेळी चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली. म्हणाल्या की, केंद्राने राज्याला काहीही मदत केली नाही. सापत्न वागणूक दिली. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. संसदेत ते निवडणुकीचा प्रचार करत आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्या म्हणाल्या की, चर्चेत राहणे हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यांना दुसरे फार काही माहिती नाही. त्याच्या प्रवक्त्त्यांना एक स्क्रीप्ट दिली जाते. त्यानुसार ते बोलत राहतात.
खडसे-दमानिया वादाची माहिती नाही
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात अंजली दमानिया यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर चाकणकर म्हणाल्या की, हा प्रकार घडला त्यावेळी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नव्हते. त्यामुळे नेमके काय ते माहिती नाही, असं सांगत त्यांनी वेळ मारून नेली.