ग्रामीण भागात सध्या वधू-वर घेताहेत चोर पावलांनी सात जन्माचे फेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:42 PM2020-05-28T22:42:57+5:302020-05-29T00:14:47+5:30
आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.
महेंद्र पगारे ।
कुकाणे : आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.
सध्या कोरोनाच्या संकटात फिजिकल डिस्टन्सिंंगच्या भीतीने वर आणि वधूकडील मंडळीना ‘सावधान’ राहून कसेतरी उरकून घ्यायचे पडलेले असते. अगदी कमी लोकात हा विधी लवकरात लवकर कसा उरकेल, याबद्दल दोन्हीकडील मंडळी मूक होकार देत जमेल त्या परिस्थितीत ‘कबूल है’ म्हणत लग्न आटोपतात. लग्नात अगोदर निमंत्रण पत्रिका वाटणे, तेही थेट घरी जाऊन. मग तो नातेवाईक कितीही किलोमीटर दूर असला थेट त्याच्या घरी नेऊनच पत्रिका द्यावी लागते. अन्यथा तो रुसण्याचा धोका जास्त असतो. यानंतर मग सुरू होतात ते अनेक सोहळे. आयाबायांचा मानपान, पाय धुणे, वर ओवाळणी, कानपिळणी, रुखवत अशा एक ना अनेक सोपस्कारांतून जावे लागते. हे करता करता मात्र सर्वांच्याच नाकीनव येते. वधू आणि वर पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जास्त गर्दी कोण जमवतो? कारण त्यातच खरा ‘रुबाब’ आणि ‘प्रतिष्ठा’ असते. लग्न- सोहळ्याला गर्दी जमा होते आणि मग वर व वधू पक्षाकडील मंडळीच्या जिवात जीव येतो. नंतर आयुष्यभर त्या लग्नाच्या गर्दीचा तोरा मिरवला जातो. मात्र, आता या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जातो आहे.
इच्छा असूनही आतेष्टांना दूरच ठेवावे लागत आहे, मात्र आतेष्टांकडून दिलगिरीही व्यक्त केली जात आहे, परंतु नातेवाईकही आता प्रेम आणि युद्धात जसे सर्व काही माफ असते तसेच अशा छोटेखानी लग्नातही सर्व काही माफ अशा भूमिकेत येऊन राग-लोभ विसरून मुकाट्याने या सोहळ्यात आॅनलाइनच सामील व्हावे लागत आहे.