ग्रामीण भागात स्वयंशिस्तीचे ग्रामस्थांकडून प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:31 PM2020-03-28T16:31:05+5:302020-03-28T16:34:24+5:30
गोरगरीब, मजुरांचे कामधंदे बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर व्यक्तिंकडून अन्नधान्य व किराणा मालाचे वाटपही केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉक डाउनाला नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली जात असली तरी, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेत सोशल डिस्टन पाळले जात आहे. गोरगरीब, मजुरांचे कामधंदे बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार टाळण्यासाठी दानशूर व्यक्तिंकडून अन्नधान्य व किराणा मालाचे वाटपही केले जात आहे.
मातोरीत लक्ष्मणरेषा
मातोरी : तालुक्यातील मुंगसरे, मातोरी, मखमलाबाद गावातील दुकानदारांनी वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी लक्ष्मणरेषा आखून दिल्या असून, त्याचे पालन करणाऱ्यांनाच वस्तूंचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची दुकानावर होणारी गर्दी व त्यातून वाढणारा संसर्ग पाहता मेडिकल, किराणा, दूध डेअरी, कीटकनाशक दुकानदारांनी एकत्रित निर्णय घेतला. त्यासाठी दुकानासमोर सुरक्षित अंतराच्या गोलाची निर्मिती केली व या गोलाकार अंतराच्या वर्तुळात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-----
विल्होळीत चौकट आखली
विल्होळी : शहरालगतच असलेल्या विल्होळी गावात औद्योगिक वसाहत, रहिवासी वसाहतीत खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी पाहता ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक दुकानाबाहेर चौकट आखून देण्यात आली असून, कोणत्याही ग्राहकाने चौकट न ओलांडण्याचे व गर्दी करण्याचे आवाहन सरपंच बाजीराव गायकवाड यांनी केले आहे. गावातील प्रत्येक किराणा दुकान, भाजीपाला, औषधालय, बँक, एटीएम या ठिकाणी एक मीटर अंतरावर सफेद रंगाने चौकोन तयार करून त्यातच उभे राहून खरेदी करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. तसेच गावातील कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार बाहेर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.