धक्कादायक! ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित; गर्भवतीसाठी केली झोळी, 3 किमी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:10 PM2022-08-13T13:10:54+5:302022-08-13T13:27:11+5:30
Nashik News : हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले
नाशिक - एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत मात्र ग्रामीण भाग आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहे. येथे पावलो पावली असुविधांच्या कळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. अमृतमहोत्सवानिमित्त मोदी सरकारच्या आवाहनानुसार देशभर १३ ते १५ ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. मात्र, या महोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. हेदपाडा येथील एका गर्भवतीला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले. मुख्य रस्त्यापासून ८ किलोमीटरवर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावाजवळ मेटकावरा व हेदपाडा ही दोन गावे आहेत. ३०० लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या भेडसावते. या गावात जाण्यासाठी रस्ता मंजूर असतानाही नेहमी डांबरीकरणाऐवजी मातीचा रस्ता तयार केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दुचाकी नेणेही कठीण होते. यामुळे येथील नागरिकांना नेहमीच पायपीट करत चिखलातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.
शुक्रवारी गावातील वैशाली सोमनाथ बेंडकोळी या गर्भवतीस अचानक कळा सुरू झाल्याने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी नातलगांनी चिखलातून पायपीट करत 3 किलोमीटर झोळी करून तिला मुख्य रस्त्यापर्यंत आणले त्यानंतर तेथून तिला रुग्णवाहिकेतून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारविना घटना या गावात नेहमीच्या झालेल्या आहे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांपर्यंत आजही विकास पोहचलेला नाही तीन वर्षांपूर्वी देखील सर्पदंशाने एका 17 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता. अजून किती दिवस अशा संकटांचा सामना करावा लागणार व आमच्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा कधी मिळणार असा प्रश्न गावकरी विचारत आहे