मालेगावातील ग्रामीण विभागाने केला लसीकरणाचा लाखाचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 07:24 PM2021-08-22T19:24:13+5:302021-08-22T19:26:04+5:30
दाभाडी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या निर्देशानुसार काळजीपूर्वक लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम यांच्या नियोजनामुळे गावासह थेट खेडे व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात सुमारे १ लाख ७३० ग्रामस्थांना कोरोनाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.
नीलेश नहिरे
दाभाडी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या निर्देशानुसार काळजीपूर्वक लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम यांच्या नियोजनामुळे गावासह थेट खेडे व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात सुमारे १ लाख ७३० ग्रामस्थांना कोरोनाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.
प्रारंभी कोरोना विषयक नियमावलीकडे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. लग्नसोहळे गावागावातील आठवडे बाजारातील गर्दी, शहरात विविध कामासाठीची ये-जा वाढल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मोठ्या गावांत कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत होती. त्यातच रुग्णाच्या संपर्कातील लोक चाचणी करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत होती. सुरुवातीला ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरण करण्यासाठीचा सहभाग अल्पसा होता, नागरिकांचा लसीकरणात सहभाग वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील प्रशासन विभागाच्या सहकार्याने गाव पातळीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या मार्फत तसेच ग्रामपंचायतीतर्फे दवंडी देत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना लसीचे महत्त्व पटल्यानंतर लसीकरण करण्यासाठी नागरिक पुढे आले.
आरोग्य विभागातर्फे कोरोना संदर्भात जनजागृतीसह लसीकरण मोहीम राबविताना विशेष काळजी घेतली जात आहे. २४ जानेवारी २०२१ पासून सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सत्रास सुरुवात करण्यात आली. त्यात फ्रंट लाईन वर्करचा समावेश करण्यात आला. हे करीत असतांना आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचा वाढलेला विश्वास लक्षात घेता तालुक्यातील सर्वच नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध करून वाढविले आहे. जिल्हास्तरावरून लस उपलब्ध झाल्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी लस घेण्यासाठी रुग्णवाहिकेचे वाहन व चालक दिलेल्या वेळेत लस घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरक्षित पोहोच करीत असतात. आजमितीस तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ५० उपकेंद्र येथे लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यातील १४१ गावागावात कोविड लसीकरण सुरू करून तालुक्यात आजपर्यंत १ लाख लाभार्थीना लसीकरण करून लाखाचा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील सर्वच ऐच्छिक लाभार्थी यांना लसीकरण लवकरात लवकर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व तालुका आरोग्य कार्यालयातील भटू शिंदे, तालुका आरोग्य सहायक देवीदास हिरे, तालुका कार्यक्रम सहायक विजय पवार, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक नंदकिशोर कासार, लेखापाल महेश काटे, तालुका समूह संघटक राजू घ्यार, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक निमेश वसावे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक नीलेश पाटील यांचे मोलाचे योगदान लाभत असल्याने ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पार झाला आहे.