ग्रामीण आरोग्य मृत्युशय्येवर
By admin | Published: September 28, 2016 12:07 AM2016-09-28T00:07:12+5:302016-09-28T00:07:39+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती
नाशिक : खोकला आणि थंडी-तापाची साथ असताना ग्रामीण भागात औषधे मिळत नाहीत. गर्भवती महिलांना दिलेले लाखो रुपयांचे धनादेश न वटताच परत गेले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची महत्त्वाची औषधेच दीड महिन्यापासून नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांना धारेवर धरले. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषी असल्यास डॉ. सुशील वाकचौरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी दिले.
या सर्व प्रकरणांवर लोकमतने मागील काही दिवसांत प्रकाश टाकत आरोग्य विभागातील अनागोंदी कारभार उघड केला होता. मागच्याच महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वैद्यकीय अधिकारी रजा मंजुरी घोटाळ्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यावरही कार्यवाही न झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शैलेश सूर्यवंशी व डॉ. भारती पवार यांनी या विषयाच्या चर्चेला सुरुवात केली. ग्रामीण भागात खोकल्यासह अन्य कोणतीच औषधे नसल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. तर कुटुंब कल्याण कार्यक्रमासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत महिला व पुरुषांच्या शस्त्रक्रियेसाठी बीटासनसह अन्य औषधेच उपलब्ध नसल्याचा आरोप डॉ. भारती पवार यांनी केला. शरद माळी यांनी आपण आरोग्य समितीचे सदस्य असून, बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देतात. आमचे शिपाईही ऐकत नाही, असे सांगताना यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी सूचना केली. प्रशांत देवरे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्याऐवजी त्यांच्याकडून काम करून घ्यावे, असे सांगितले. डॉ. सुशील वाकचौरे यांनी खोकल्याची औषधे नसल्याचे मान्य करत औषध खरेदीला तांत्रिक मान्यता शासन स्तरावरून होत असल्याचे सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)