पेठचे ग्रामीण रुग्णालय पुन्हा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Published: May 13, 2015 11:47 PM2015-05-13T23:47:32+5:302015-05-13T23:48:46+5:30

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकाच्या बदलीने भार वाढला

The rural hospital of Peth again on the ventilator | पेठचे ग्रामीण रुग्णालय पुन्हा ‘व्हेंटिलेटर’वर

पेठचे ग्रामीण रुग्णालय पुन्हा ‘व्हेंटिलेटर’वर

Next

पेठ : तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालयातील बंधपत्रावरील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची राज्य निवड मंडळाकडून अन्यत्र स्थायी पदावर नियुक्ती झाल्याने येथील रुग्णालयाचा कारभार एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या शिरावर आला आहे. तालुक्यातील गरीब आदिवासी जनतेच्या आरोग्याची त्यामुळे ससेहोलपट होणार असून, ग्रामीण रुग्णालय पुन्हा ‘व्हेंटिलेटर’वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात एकूण २०२ गावे व पाडे असून, एकूण लोकसंख्या एक लाख ३० हजार असलेल्या तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. सात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार तसा रामभरोसे, तर ग्रामीण रुग्णालयात मागील एक-दोन वर्षापासून २४ तास हमखास सेवा मिळत आहे. येथे एक वैद्यकीय अधीक्षकांसह तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून, वैद्यकीय अधीक्षक या पदावर डॉ. शिवाजी लहाडे या शल्यचिकित्सकांची नियुक्ती आहे.
ते पेठ, घोटी, निफाड, हरसूल, गिरणारे येथे जाऊन लहान-मोठ्या शस्त्रक्रिया करत असल्याने येथील रुग्णालयात आठवड्यातील दोन दिवस सेवा देतात, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तीन पदांपैकी एक पद स्थायी असून, त्या पदावर डॉ. नीलेश लाड हे काम बघत आहेत, तर दोन पदे बंधपत्रावर भरण्यात आली आहेत. त्या बंधपत्रावरील दोघा अधिकाऱ्यांची राज्य निवड मंडळातर्फे स्थायी पदावर नियुक्ती झाल्याने रुग्णालयाचा संपूर्ण कारभार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या शिरावर आल्याने यापुढे २४ तास वैद्यकीय सेवा मिळणे अवघड झाले आहे. गरिबांना मोफत मिळणारा उपचार त्यामुळे आता विकत घेण्याची वेळ आली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असून, आंतररुग्ण विभागात रोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तालुक्यातील रुग्णांबरोबर शेजारच्या गुजरात राज्यातील २५ ते ३० गावांना या आरोग्यसेवेचा लाभ मिळत
आहे. तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नित्यनेमाने होणाऱ्या अपघातातील जखमींना याच रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. गेल्या एक महिन्यापासून तालुक्यात दूषित पाण्यामुळे उलट्या-जुलाबांचे ८-१० रुग्ण रोज दाखल होत असल्याने तालुक्याची आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: The rural hospital of Peth again on the ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.