दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:32 PM2021-08-29T22:32:20+5:302021-08-29T22:33:05+5:30
जानोरी : ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पथदीपांची बिले थकल्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याने दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात अंधार पसरला असून, शासनाने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने बिले भरावी, असा आदेश काढून ग्रामपंचायतींपुढे मोठा पेचप्रसंग उभा केला आहे. त्यामुळे कमी बिल येण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद व आमदार निधीतून दिलेले हायमास्ट बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामीण भागात असलेल्या पथदिव्यांची बिले १९८४ पासून जिल्हा परिषदेमार्फत भरली जात होती. परंतु, शासनाने नुकताच अध्यादेश काढला असून, त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे, ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांची येणारी वीज बिलांची देयके ग्रामपंचायतीने त्यांना वर्ग झालेल्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावी, असे निर्देशित केले आहे. दिंडोरी तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत येत असल्याने त्यांना शासनाकडून येणारा निधी प्रामुख्याने १५ वा वित्त आयोग व पेसा या दोन शीर्षकाखाली प्राप्त होतो. तालुक्यातील दोन ते तीन ग्रामपंचायती वगळता बाकीच्या सर्वच ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती ही गेल्या वर्षापासून बेताचीच आहे. दैनंदिन खर्च करताना ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत असतानाच शासनाने वीज बिलांचा चेंडू ग्रामपंचायतीच्या कोर्टात टाकून आपले हात झटकले आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायत हद्दीतील कनेक्शन कट केल्याने ग्रामीण भागात अंधार पसरला आहे. अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने रात्रीच्या वेळेस नागरिकांना घराबाहेर पडताना अंधारामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली श्वापदांची हल्ले व सर्पदंशाच्या घटनेत वाढ होत आहे.
जि.प.नेच बिले भरावीत
याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रत्येक ग्रामपंचायतीची थकबाकी लाखांच्या घरात असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडित केल्याचे उत्तर मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले असून, जर ग्रामपंचायतीने ही बिले भरली तर ग्रामविकासासाठी निधी शिल्लक राहणार नसल्याचे अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचे म्हणणे आहे. शासनाने त्वरित पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत वीज बिले भरून ग्रामीण भागातील अंधार दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.