ग्रामीण पोलिसांचा स्कूल बसचालकांना ‘अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:04 AM2019-07-22T01:04:20+5:302019-07-22T01:05:07+5:30
पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली.
नाशिक : पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली. या तीन दिवसांत ग्रामीण भागातील काही ठराविक रस्त्यांवर वाहतूक नियमांची पायमल्ली करत धावणाऱ्या बसेसवर ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांनी ‘वॉच’ ठेवून कारवाई केली.
नाशिक-गंगापूर, त्र्यंबकेश्वर, चांदशी, गिरणारे, ओझर, चांदवड या मार्गांवर सिंह यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने सलग तीन दिवस शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया बसेसवर करडी नजर ठेवली. सुमारे १५१ बसेसची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियम सर्रासपणे धाब्यावर बसविणाºया ४९ बसचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आरटीओच्या संयुक्त पथकाने ४९ वाहनांवर कारवाई केली असून, त्यातील काही चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहनचालकांकडून सहा हजार २०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी स्कूलबसमध्ये चालकासह परिचारक आहे की नाही याची तपासणी केली. चालक आणि परिचारकाची चारित्र्य पडताळणी करून घेण्याचेही आवाहन पोलिसांनी केले. वाहतूक नियम, विद्यार्थी सुरक्षितता याबाबत प्रबोधन करण्यात आले. आगामी दिवसांतही वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन पथकामार्फत स्कूल बसेसची नियमित तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीह विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडून उल्लंघन
सिन्नर, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये कर्मचाºयांची वाहतूक करणाºया खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडूनही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. भरधाव वेगाने बस दामटवित दुचाकी, चारचाकीस्वारांना कट मारून सर्रासपणे बेजबाबदार व धोकादायकरीत्या ओव्हरटेक करत कंपन्यांचे बसचालक वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलीस व आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खासगी कंपन्यांच्या बसेसकडून यापूर्वी अनेकदा ‘रॅश ड्रायव्हिंग’मुळे अपघात घडले आहेत. पोलिसांनी याबाबत तत्काळ पावले उचलून कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.