दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:32 PM2020-12-26T20:32:24+5:302020-12-27T00:34:27+5:30
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या २२ ग्रामसेवकांच्या ४२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दाखले लागत आहेत. त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिन्नर तालुक्यात होत आहेत. ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दाखले देणे, घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या पावत्या वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये थांबावे की, अर्ज स्वीकारण्यासाठीची जबाबदारी पार पाडावी, असा पेच संबंधित ग्रामसेवकांसमोर निर्माण झाला आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने आधीच पॅनलचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व त्यांच्या पाठिराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. ग्रामसेवक संघटनेने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कारण निवडणूक कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
इच्छुक उमेदवारांना चार-पाच दिवसात दाखले देणे व त्यानंतर या गावांतील अन्य नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे, त्यांनाही आवश्यक दाखले देणे अशी कामेही होऊ शकतील. याबाबतीत तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा या मागणीने जोर धरला आहे.
शासनाने घ्यावी दखल
निवडणूक विभागाने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास नागरिकांची अडचण होणार नाही. इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची धावपळ थांबेल, अशी आमची भूमिका असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित गावांमध्येही निवडणुका असल्या तरी अन्य नागरिकांनादेखील विविध कामांसाठी दाखले, उतारे लागत असतात. त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.