पिकांच्या काढणीची लगीनघाई, खरड छाटणीला मजुरांचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:47 PM2021-03-30T23:47:21+5:302021-03-31T01:04:13+5:30
शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.
शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.
गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना रोगाने मात केली असून, त्याचा परिणाम शेतकरी वर्गापासून व्यावसायिक, व्यापारीवर्ग, मजूरवर्ग व इतर सर्वच उद्योगधंद्यांवर झाला आहे. परंतु, त्याच्या यातना बहुतांशी शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर भोगाव्या लागल्या आहेत. द्राक्षे हे प्रमुख नगदी पीक जरी असले तरी पहिल्या टप्प्यातील द्राक्षाला सरासरी योग्य भाव मिळाला असून, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील कांदे व द्राक्षे मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ आल्यामुळे शेती व्यवसाय आता तरी आतबट्ट्याचा खेळ झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
पाच वर्षांपूर्वी द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात होते. परंतु, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवकाळी पाऊस, फयान, रोगराईचा सामना, व्यापारी पलायन, कवडीमोल मिळत असलेला द्राक्षाचा भाव या गोष्टींमुळे ते आता दिवसेंदिवस बेभरवशाचे पीक ठरत आहे. निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाचे भाव स्थिर नसल्यामुळे लोकल विक्री करणाऱ्या द्राक्षाचा कचऱ्याप्रमाणे भाव होत असल्यामुळे ह्यकही खुशी, कही गमह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
द्राक्षाच्या पिकाला वर्षभर टप्प्याटप्प्याने खर्च करावा लागत असतो. प्रति वर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे उत्पादन खर्च वजा जाता झीरो बजेटमध्ये आले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्ष बागांची छाटणी कमी झाली असली तरी पहिल्या टप्प्यातील काढणी झालेल्या द्राक्ष वेलींना खरड छाटणी पूर्वमशागत करणे, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी पाचटाचे मल्चिंग करणे, खते व पाणी देऊन पुढील वर्षाच्या हंगामातील पीक घेण्यासाठी वेलींची खरड छाटणी करून माल काडी तयार करणे गरजेचे असते.
द्राक्ष वेलींना पाणी देण्यासाठी वीजबिल वसुलीच्या धडक मोहिमेमुळे ठिकठिकाणी वीज रोहित्र खंडित केले जात असताना तसेच लोडशेडिंगमुळे वेलींना पाणी देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष वेलींच्या खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील द्राक्षबागांची काढणी, कांदे, हरभरे, गहू काढणे, द्राक्षबागांची छाटणी पूर्व मशागती करणे ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्यामुळे पाणी भरणे आदी सर्व कामांची एकच धांदल उडाली असून, मजुरांची टंचाई भासत आहे.