शिंदे सेनेत इच्छूकांची धावाधाव; अजय बोरस्ते यांच्या पाठोेपाठ हेमंत गोडसे मुंबईत
By संजय पाठक | Published: April 12, 2024 03:58 PM2024-04-12T15:58:38+5:302024-04-12T16:02:35+5:30
खासदार श्रीकांत शिंदेे यांच्या भेटीसाठी उल्लास नगरात
संजय पाठक, नाशिक- लाेकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी नवीन व्टीस्ट आला असून शिंदे सेनेकडून अचानक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पाचारण केल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील पुन्हा सतर्क झाले आहेत. त्यांनी बोरस्ते मुंबईला जाताच गोडसे यांनीही खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठले आहे.
नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे सेना दावे करीत आहेत त्यातच उमेदवारांची नावे पुढे आल्यानंतर संभाव्य उमेदवार चांगला कसा नाही हे देखील सांगितले जात आहेत. अशातच नवीन पर्यायांचा शोध केला जात असल्याची देखील चर्चा पसरली. त्यात शिंदे सेनेत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पर्याय म्हणून जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव पुढे आले. त्यांना आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईत बोलवून घेतले. त्यानुसार ते रवाना झाले. काही वेळाने खासदार हेमंत गोडसे शक्ती प्रदर्शनासाठी तातडीने कार्यकर्ते जमा करीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीसाठी उल्हासनगरात रवाना झाले आहेत.
खासदार हेमंत गोडसे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अधिक जवळचे मानले जातात. नाशिकमध्ये पक्षाच्या संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी थेट हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर करून खळबळ उडवून दिली हेाती.