ऑक्सिजन बेडसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:01+5:302021-04-20T04:15:01+5:30
बंदीमुळे भाजीपाला दरावर परिणाम नाशिक : कठोर निर्बंधामुळे किरकोळ विक्रेत्यांना बाजारात भाजी विकणेही कठीण झाले असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या दरावर ...
बंदीमुळे भाजीपाला दरावर परिणाम
नाशिक : कठोर निर्बंधामुळे किरकोळ विक्रेत्यांना बाजारात भाजी विकणेही कठीण झाले असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम दिसू लागला आहे. अनेक फळभाज्यांचे दर घसरले असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. मागील वेळेसारखी स्थिती निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
फेरीवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम
नाशिक : कठोर निर्बंधांमुळे आणि एकूणच वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक फेरीवाल्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या विक्रेत्यांना ग्राहक मिळणे मुश्किल झाले असल्याने अनेकांनी सकाळी फेरी मारणेही बंद केले आहे. यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली
नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची आणि मेडिकल दुकानदारांनी डोकेदुखी वाढली आहे. अनेक नागरिकांशी या व्यावसायिकांचा संपर्क येत असल्याने त्यांच्याकडे या इंजेक्शनबाबत वारंवार विचारणा होत असून कुणाला काय उत्तर द्यावे असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे.
रुग्णवाहिकांचे दर वाढल्याने नाराजी
नाशिक : शहरातील रुग्णवाहिकांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णवाहिकांना सतत बुकींग असल्यामुळे त्यांच्या दिवसभरातील फेऱ्याही वाढल्या आहेत. शासकीय रुग्णवाहिका सेवेवरही त्याचा ताण आला आहे.
रुग्णसेवेसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार
नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्थांनी आता रुग्णसेवा करण्यावर भर दिला असून आपापल्यापरीने रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासही हातभार लावला जात आहे.
गरीब महिलांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर
नाशिक : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून अनेक गोरगरीब महिलांचा रोजगार बंद झाला असून या महिलांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हाताला काम मिळत नसल्याने घरखर्च चालविणे या महिलांना कठीण झाले असून त्यांच्याकडे असलेली जमापुंजीही संपत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
संकटाच्या काळातही आरोप-प्रत्यारोप
नाशिक : कोरोना संकटाच्या काळातही राजकीय पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या संकटाच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी हातात हात घेऊन काम करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पन्नास टक्के उपस्थितीमुळे कामे खोळंबली
नाशिक : कोरोनामुळे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती खूपच कमी असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचा नियम लावल्याने दररोज कार्यालयांमध्ये कुणाची तरी कमतरता असते. त्यामुळे कामे होत नाहीत.
टपाल खात्याच्या बटवड्यावर परिणाम
नाशिक : कठोर निर्बंधामुळे टपाल खात्याच्या बटवड्यावरही परिणाम झाला असल्याचे दिसून येते. यामुळे काहींना अनेक महत्त्वाची कागदपत्रे उशिराने मिळत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वसुली मोहीम राबवूनही थकबाकी कायम
नाशिक : राज्य वीज वितरण कंपनीने मार्च महिन्यात थकबाकी वसुली मोहीम राबविली असली तरी अनेक ग्राहकांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ही थकबाकी कशी वसूल करावी असा प्रश्न महावितरणसमोर निर्माण झाला आहे. कोरोना संकटामुळे नागरिक अडचणीत असल्याने वसुलीत अडथळा निर्माण होत आहे.
रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : शहर परिसरात महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात येत आहे.