धोंडा न्हाण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:36 AM2018-05-21T01:36:06+5:302018-05-21T01:36:06+5:30
त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला.
त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला.
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर अनेक महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. अधिकमासाची सुरुवात झाल्यापासून त्र्यंबकेश्वर शहर गजबजून गेले आहे. भर उन्हात भाविक अनवाणी पायाने अक्षरश: पळत सुटतात. त्यातल्या त्यात वृद्ध व लहान मुले असल्यावर तर अशा भाविकांचे हाल बघवत नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर सभोवती रस्त्यावर कार्पेट टाकून तात्पुरती उन्हापासून व्यवस्था केली आहे. तरीदेखील चटके बसायचे ते बसतातच. लक्ष्मीनारायण चौक ते कुशावर्त तीर्थ या ७५० फूट व ३ फूट रुंदीच्या रबर पेंटचा (आॅइलपेंट) पट्टा भाविकांना जाण्या-येण्यासाठी येथील पुरोहित संघातर्फे मारण्यात आला आहे. या पेंटचा पट्टा मारल्याने चटके बसत नसल्याचा दावा पुरोहित संघातर्फे केला जात आहे. मे महिन्याच्या सुट्या, त्यात शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी नोकरवर्ग त्र्यंबकेश्वरला हमखास येत असतात. त्यामुळेच सध्या अधिकमासाच्या निमित्ताने हिंदूधर्मीय भाविकांचा कल त्र्यंबकेश्वरला वाढला आहे.
त्र्यंबक हे तीर्थक्षेत्र असल्याने त्र्यंबकेश्वराचे दर्शन व कुशावर्त तीर्थात स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. विशेषत: महिलावर्गाची गर्दी लक्षणीय दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील भाविक त्र्यंबकेश्वर गाठत आहेत. आता दररोज त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने त्र्यंबक नगर परिषद सज्ज झाली आहे. साफसफाई, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा आदी बाबी नगर परिषदेने सांभाळल्या आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस आले आहेत, तर अन्य भेटवस्तू पूजेचे सामान आदींची चांगली विक्र ी होत आहे.
जावईबापू, तुम्हाला वाटेल ती वस्तू घ्या...
अधिकमासात तीर्थक्षेत्री दर्शन, स्नानसंध्या, पूजा, धार्मिक विधी, दान, गोमातेला घास आदी पुण्य सांगितले आहेत. दर तीन वर्षांनी येणाºया अधिकमास तथा धोंड्याच्या महिन्यात लाडक्या जावईबापूंना सासुरवाडीकडून आपापल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देण्यात येते. कोणी कपडे घेतात, कोणी सोन्याची वस्तू देतात, तर कोणी रोख रकमेच्या स्वरूपात भेट देतात. हेतू हा की तुमच्या पसंतीप्रमाणे तुम्हाला वाटेल ती वस्तू घ्या.. अर्थात, दिलेल्या रोख रकमेत बसेल अशी.