नाशिकमधील सराफ बाजारातील व्यावसायिकांची धावपळ; धरणक्षेत्रात संततधार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:28 PM2021-09-29T14:28:24+5:302021-09-29T14:43:55+5:30
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
नाशिक: संततधार पावसामुळे जील्हा प्रशासनाने नदीकाठच्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, त्यामुळे सराफ बाजारातील व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांतील मौल्यवान वस्तू सुरक्षीत रित्या आवरून ठेवली असून व्यावसायिक दुकाने बंद करीत आहेत. तसेच सर्वत्र दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.
गंगापूर धरणातून साडे १० हजार क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून बुधवारी दूपारपर्यंत ४५ हजार ८२क्युसेक इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित झाले आहे. यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होऊन जायकवाडीमधूनही विसर्ग वाढू शकतो.
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नांदगाव, दिंडोरीसह आसपासच्या भागास मुसळधार पावसाने झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. जिल्ह्यातील साकुरी गावची गाव नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. कांदा, बाजरी, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तीनदा झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे नदीला आलेला पूर, झालेले नुकसान, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजून मिळालेले नाही, नुसता पंचनामा केला जातो, परंतु शासनाकडून भरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे.
नाशिक : नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे pic.twitter.com/SN4X9IMmz9
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2021
दरम्यान, २८ तारखेलाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा येवला तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर तुलनेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुरळक पाऊस होता. मंगळवारी पहाटेपासून नाशिक, दिंडोरी, नांदगाव व आसपासच्या भागात पावसाने जोर पकडला. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पुरामुळे काही भागांशी संपर्क खंडित झाला होता.