बेस्ट सेवेतील एस. टी. बसेस माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:51+5:302021-05-16T04:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्यावर्षी सप्टेंबरपासून मुंबई व उपनगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी नाशिक विभागातून पाठविण्यात येणाऱ्या बसेस आता शनिवार (दि. १५)पासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत असलेल्या बसेस माघारी येणार आहेत.
कोरोनाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने बेस्ट उपक्रमाला वाहतूक करण्यासाठी राज्यभरातील आगारांमधून सुमारे एक हजार बसेस पुरविण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांमधूनदेखील बसेस, चालक-वाहक तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुंबईत सेवा बजवावी लागली. कोरोनाच्या काळातील ड्युटी तसेच राहण्याची आणि अन्नपाण्याची होणारी गैरसोय यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी करण्याबाबत नाराजीदेखील होती. मात्र, मुंबईत ड्युटी करणे बंधनकारक करण्यात आल्याने एस. टी. प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवले.
नाशिक विभागातून पंधरा दिवसातून चालक-वाहकांना मुंबईला जावे लागत होते. जिल्ह्यातील १३ आगारांमधून मुंबईला बसेस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार मागील वर्षी सुरू झालेली ही सेवा मे २०२१पर्यंतही सुरू आहे. सद्यस्थितीत ५० बसेस आणि २०० कर्मचारी मुंबईला सेवा बजावत आहेत. आता मात्र या कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने राज्यभरातील एस. टी. विभागातून आलेल्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना परत पाठविण्याबाबतचे पत्र राज्य परिवहन महामंडळाला दिले आहे.
मुंबईत कोरोनाच्या काळात सेवा करण्याबरोबरच आपल्या जिल्ह्यातही लागलीच सेवा बजवावी लागत होती. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची चिंता होती. यातूनच मुंबईतील ड्युटीला विरोध केला जात होता. मात्र, अशा विरोध करणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आल्याने चालक-वाहकांना मुंबईत सेवा करावी लागत होती. आता ‘बेस्ट’नेच एस. टी.ची सेवा कमी केल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
---इन्फो--
राज्यभरातील नऊ आगारांच्या २५५ बसेस रिटर्न
‘बेस्ट’ने रायगड, रत्नागिरी, धुळे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सांगली अशा नऊ आगारांतील सुमारे २५५ बसेस पुन्हा संबंधित विभागांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काही विभागांच्या बसेस थोड्या प्रमाणात सुरू राहणार आहेत.