सख्ख्या मित्रांनी ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चे स्टेटस ठेवले अन् सुपरफास्ट एक्सप्रेसपुढे स्वत:ला झोकून दिले
By अझहर शेख | Published: June 9, 2024 04:06 PM2024-06-09T16:06:13+5:302024-06-09T16:07:47+5:30
बालपणापासून सोबत खेळलेले अन् सोबतच वाढलेले म्हसोबानगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय सचिन अन् संकेतची मैत्री या भागात सर्वपरिचित होती. या दोघांचे सख्ख्य बघून हे मित्र नव्हे तर अनेकांना सख्खेच भाऊच वाटायचे.
नाशिकरोड : बालपणापासून सोबत खेळलेले अन् सोबतच वाढलेले म्हसोबानगरात राहणाऱ्या सतरा वर्षीय सचिन अन् संकेतची मैत्री या भागात सर्वपरिचित होती. या दोघांचे सख्ख्य बघून हे मित्र नव्हे तर अनेकांना सख्खेच भाऊच वाटायचे. अचानकपणे त्यांच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक अन् दोघांनी टोकाचा निर्णय घेत शनिवारी (दि.८) सायंकाळी स्वत:च्या व्हॉट्सॲप क्रमांकाच्या स्टेट्सवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशी पोस्ट अपलोड केली. यानंतर दोघेही वालदेवी नदीजवळून जाणाऱ्या रेल्वे रूळावर गेले अन् एका सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेपुढे स्वत:ला झोकून देत जीवनप्रवास कायमचा थांबविला. या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चेहडीपंपिंग गीते मळ्यात असलेल्या म्हसोबानगरात सचिन दिलीप करवर (१७), संकेत कैलास राठोड (१७) हे दोन्ही बालपणाचे मित्र होते. दोघांच्याही कुटुंबाची परिस्थिती फारकाही चांगली नसून जेमतेम आहे. यामुळे दोघेही कामधंदा करून कुटुंबाला हातभारसुद्धा लावत होते. सचिनचे वडील मालधक्का येथे मजुरी करतात व संकेतचे वडील मिस्तरी काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. या दोघांनी नुकतीच अकरावीची परिक्षा उत्तीर्ण केली होती. बारावीला प्रवेश घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. मात्र नियतीला जणू हे मान्य नसावे.
शनिवारी या अल्पवयीन मित्रांच्या जोडीने या जगाचा कायमचा निरोप घेतला. यामुळे करवर व राठोड कुटुंबियांवर आभाळ फाटले. घटनेची माहिती म्हसोबानगर परिसरात वाऱ्यासारखी पसरली अन् संपुर्ण परिसर एकाएकी सुन्न झाला. दोघांच्या घराबाहेर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. रविवारी दुपारी नाशिक रोड येथील देवळालीगाव स्मशानभूमी दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी (दि.९) दुपारी देवळालीगाव स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.