गलवान खोऱ्यात जवानांना वाचविताना नाशिकचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण; आज अंत्यसंस्कार होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:01 AM2020-06-27T07:01:19+5:302020-06-27T07:01:29+5:30
शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या इंजिनिअर रेजिमेंटचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव शनिवारी (दि.२७) सकाळी त्यांच्या मुळगावी लष्करी वाहनाने मध्यरात्री दाखल झाले. शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसांपासून पुर्व लडाखमधील गलवान खो-यातील भारत-चीनच्या लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याकडून कुरापती वाढल्याने तणाव निर्माण झाला आहे. या सीमेवर भारताच्या अद्याप वीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. भारत-चीन सैन्यामधील वाढता संघर्ष लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गलवान खो-यातून वाहणा-या एका नदीवर भारतीय सैन्याची एक तुकडी पूल उभारणी करत असताना अचानकपणे नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे पुल बांधणी करत असलेले काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरवीर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली.
दरम्यान, जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला दगडचा जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती सचिन यांच्या धाकट्या बंधूंना तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनाने साकुरी झाप गावातील मोरेवाडीसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.