सेनेच्या बंडाच्या पवित्र्याने युतीत असहकार्याची ठिणगी
By श्याम बागुल | Published: October 15, 2019 08:12 PM2019-10-15T20:12:34+5:302019-10-15T20:15:10+5:30
युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्याने सेनेत असंतोष खदखदत होता
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भाजपने घुसखोरी केल्याचा आरोप करून नाशिक शहराच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी पदांचे राजीनामे देऊन सेना बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे भाजप-शिवसेना युतीवर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. सेनेच्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातच थांबून प्रचार करण्याचे जाहीर करून शहरातील नाशिक मध्य व पूर्व मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनाही वा-यावर सोडले आहे.
युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्याने सेनेत असंतोष खदखदत होता व त्यातूनच सेनेने पश्चिम मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. सेनेच्या या बंडखोरीविरुद्ध भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करतानाच सेनेच्याही नेत्यांच्या कानी हा प्रकार घातला. परिणामी सेनेने आणखी चिडून पश्चिम मतदारसंघात प्रचाराला वेग दिल्यामुळे पक्षाकडून कारवाई होण्याच्या शक्यतेने मंगळवारी नाशिक शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्द करून शहरातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पश्चिम मतदारसंघात प्रचार करतील, असे जाहीर केले. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांची डोकेदुखी आणखी वाढली, त्याचबरोबर नाशिक मध्य व नाशिक पूर्वमधील भाजपच्या उमेदवारांना आता शिवसेनेचे सहकार्य मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप व सेनेने निवडणुकीत युती केली असून, ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार असेल तेथे सेनेचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करतील, तर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते करतील, असे ठरलेले असून, त्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांना गृहीत धरले आहे. मात्र नाशिक शहरात सेनेने घेतलेल्या भूमिकेचा जिल्ह्यात युतीच्या अन्य उमेदवारांवर परिणाम होणार असून, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात यापूर्वीच सेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे युतीत धुसफूस सुरू असताना आता थेट सेनेने बंडाचा पवित्रा घेतल्याने त्यात ठिणगी पडली आहे.
जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी सेना नऊ व भाजपा सहा जागांवर लढत असून, त्यातील निफाड, नांदगाव, इगतपुरी या तीन ठिकाणी सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे तेथील वचपा काढण्यासाठी आता सेनेने भाजपचे उमेदवार उभे असलेल्या ठिकाणी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीच्या बेबनावाचा फायदा विरोधी पक्षांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.