गोवंश पवित्र ना, मग इतरही पशुहत्त्या करू नका
By admin | Published: August 3, 2015 11:15 PM2015-08-03T23:15:18+5:302015-08-03T23:16:21+5:30
! ‘पेटा’चे आवाहन : कुंभमेळ्यातील भाविकांसाठी लावले फलक
नाशिक : गाय पवित्र असल्याने ज्याप्रमाणे गायींची हत्त्या केली जात नाही आणि मांसाहार केला जात नाही, त्याप्रमाणे कोंबडी आणि अन्य प्राण्यांची मांसाहारासाठी हत्त्या कशासाठी करता, असा प्रश्न पेटा या प्राणिमित्र संघटनेने केला असून, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मांसाहार टाळा, असे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी लावण्यास प्रारंभ केला आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट आॅफ अॅनिमल्स पेटाने जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे आणि मांसाहारासाठी पशुहत्त्या करू नका, असे आवाहन केले आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. हिंदू गायींना पवित्र मानत असल्याने गायींना ठार मारणे पाप मानले जाते. मग इतर प्राण्यांकडे त्याच भावनेने बघून त्यांचे भक्षण करणेही थांबवायला हवे, असे आवाहन पेटाने केले आहे. कोंबड्यादेखील गायींना त्यांच्या पिल्लांसाठी जागरूक आणि छळाप्रती संवेदनशील असतात. तरीही त्यांंना अगदी निर्दयपणे ठार मारले जाते, असे पेटाच्या आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी यांनी म्हटले आहे. मांसाहारासाठी कोंबड्यांचा वापर करणारे कारखाने कोंबड्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवतात. तेथील उग्रवासात त्यांना राहावे लागते. इतकेच नव्हे तर या प्राण्यांना मारण्यासाठी वाहनातून नेले जाते. तेथे गुदमरून किंवा इजा होऊन अनेक कोंबड्या मरतात. अशाच प्रकारे शेळ्या आणि मासेही निर्दयपणे मारले जातात, असे पेटाचे म्हणणे आहे.
शाकाहार करणारा मांसाहाराच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असतो. शाकाहार करणाऱ्याला हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि अन्य आजार होण्याची शक्यता कमीच असते. भारतात हे सर्व मोठे आजार सर्वाधिक असल्यामुळे शाकाहारी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)