...अन् सदाभाऊ खोत यांनी वाटेतच वाहन थांबवले; विराट मोर्चातील आंदोलकांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 08:21 PM2023-06-13T20:21:39+5:302023-06-13T20:22:15+5:30
कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरत आजपासून नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयकडे विराट मोर्चा काढला.
नाशिक - राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे विदर्भ, खानदेश दौऱ्यावर होते. मंगळवारी हा दौरा आटपून खोत मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी नाशिक इथं त्यांना वाटेत विराट मोर्चा दिसला. या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सदाभाऊ खोत यांनी मोर्चाकडे पाहून तात्काळ वाहनचालकाला कार बाजूला घ्यायला लावली आणि आंदोलकांशी संवाद साधला.
आदिवासी विकास विभागाने दिनांक २५ मे २०२३ रोजी १० वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग ३ वा वर्ग ४ कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊ नये याबाबतचे शासन परिपत्रक काढले आहे. परंतु दहा वर्षाखालील कार्यरत असलेल्या सर्व रोजंदारी वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत संरक्षण देऊन समायोजनाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता.
कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरत आजपासून नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयकडे विराट मोर्चा काढला. यावेळी सदाभाऊ खोत हे देखील या मोर्चातील गावगड्यातील कर्मचाऱ्यांसोबत थोड पायी चालले आणि त्यांच्याशी चर्चा करत त्यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला. तसेच सदाभाऊ खोत यांनी आदिवासी मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधून याबाबत एखादी बैठक तात्काळ लावण्याबाबत देखील विनंती केली आहे. त्यानुसार आता ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.