सादरे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकणार?
By admin | Published: October 30, 2015 11:25 PM2015-10-30T23:25:39+5:302015-10-30T23:26:36+5:30
सादरे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकणार?
नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी स्वत: लिहिलेल्या आत्महत्त्यापूर्व निवेदनाच्या आधारे, परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकरवी अगोदरच एक चौकशी सुरू असताना, ते प्रामुख्याने ज्यांची चौकशी करणार त्यांचीच चौकशी करण्याचे स्थानिक पोलिसांचे काम आता राज्यस्तरीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने हे प्रकरण चौकशांच्या फेऱ्यातच अडकून पडेल की काय, अशी साधार शंका निर्माण झाली आहे.
राज्याच्या गृह विभागाने कोणताही गाजावाजा न करता वरील निर्णय अगदी गुपचूप घेतल्यानेही शंकेस जागा झाली आहे. त्यातच चौकशीचे काम जो अधिकारी करणार तो त्याच्या समकक्ष दुसऱ्या निरीक्षकाची आणि त्याच्याहून उच्चपदस्थ पोलीस अधीक्षकाची चौकशी नि:पक्षपातीपणाने व निडर होऊन करू शकेल याबाबतही शंकाच आहे. (पान ५ वर)
पोलीस निरीक्षक अशोक सादरे जळगाव जिल्ह्णात नियुक्त पण निलंबित होतेआणि त्यांनी नाशकातील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्त्या केली,त्यामुळे दोन्ही जिल्ह्णांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर आणि तेथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते या दोघांना संशयित म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. सादरे यांची आत्महत्त्या वाळू ठेकेदारीशी निगडित असल्याने साहजिकच महसूल खाते आणि महसूलमंत्री यांच्याशी तिचा संबंध जोडला जात आहे. त्यातच भारतीय पोलीस सेवेतील एका अधिकाऱ्याची कार्यपद्धती सादरे यांच्या निवेदनाने संशयास्पद ठरल्याने संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी व्हावी, असा कोणताही हेतू यात दिसत नाही.
सादरे यांच्या आत्महत्त्येला दोन आठवड्यांचा काळ उलटून गेला. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी पंचनामा, साक्षीदारांचे जाब-जबाब, फिर्यादीची तक्रार, पुरावे गोळा करणे आदि कामे स्थानिक अधिकाऱ्यांनी पूर्ण करून गुन्हाही दाखल केला आहे. संशयित आरोपींच्या अटकेची तयारीही स्थानिक पोलीस करीत असताना (सागर चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला) अचानक प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. त्यात स्थानिक पोलिसांनी केलेले कामच निर्णायकही ठरणार आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह चौकशी करीत आहेत. ती अशोक सादरे यांची पोलीस खात्यातील वर्तणूक व त्यांना सेवेत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला त्रास याच्याशी संबंधित आहे. सादरे सेवेत असताना तीनदा त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनीच निलंबित केले होते. आणि विशेष म्हणजे सादरे यांच्या तिसऱ्या निलंबनाच्या आधी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केवळ बदलीचा प्रस्ताव पाठविला असतानाही त्यांना विशेष महानिरीक्षकांनी निलंबित केले होते. आता तेच हे प्रकरण हाताळणार आहेत. परिणामी एकाच प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी तिच्यातील गूढताच दर्शविते.