बैठकीवरून महापालिकेत नाराजी नाट्य
By admin | Published: May 13, 2015 01:27 AM2015-05-13T01:27:39+5:302015-05-13T01:28:21+5:30
बैठकीवरून महापालिकेत नाराजी नाट्य
नाशिक : महापालिकेची विकास नियंत्रण नियमावली आणि नगररचना विभागाकडून येणाऱ्या अडचणीसंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.१३) मंत्रालयात आमदार आणि शहरातील बांधकाम व्यावसायिक यांची बैठक बोलाविली आहे. दरम्यान, या बैठकीवरून महापालिकेत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य अनुभवाला मिळाले.महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीसंबंधी आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले होते. शासनाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून शहरातील चारही आमदारांना बैठकीचे निमंत्रण देण्याची सूचना केली होती. आयुक्तांनी सदर पत्रावर शेरा मारत नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे यांना त्यांच्या स्वाक्षरीने आमदारांना निमंत्रण देण्याची सूचना केली. त्यानुसार शेंडे यांनी पत्रव्यवहार केला, परंतु सदर बैठक नाशिक महापालिकेशी संबंधित असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून महापौर-उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांना निमंत्रित न केल्याने नाराजी नाट्य अनुभवाला मिळाले. या नाराजीचा राग सहाय्यक संचालकावर काढण्यात येऊन त्यांनी केलेल्या पोस्टमनच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)