महायुतीच्या विरोधात आंदोलन करू सदाभाऊ खोत : चांदवड, सटाण्याच्या जागेवर दावा
By Admin | Published: September 9, 2014 10:57 PM2014-09-09T22:57:23+5:302014-09-10T01:07:33+5:30
महायुतीच्या विरोधात आंदोलन करू सदाभाऊ खोत : चांदवड, सटाण्याच्या जागेवर दावा
नाशिक : केंद्र सरकारने आता राबविता येत असलेल्या शेतकरी विरोधातील धोरणात बदल न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीच्या विरोधात आंदोलन छेडेल असा इशारा देत, राज्यातील विधानसभेच्या १२५ जागा शेतकरी धोक्यात आणू शकतात, अशी गर्भित धमकीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली.
नाशिक येथे कांदा उत्पादकांच्या आंदोलनानंतर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून असून, अनेक सरकारे आली व गेली परंतु कोणीच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकलेले नाही. आता पुन्हा कांदा प्रश्न उपस्थित होताच, काही ठिकाणी फलक लावून ‘माफ करा साहेब, आम्ही चुकलो’ असे फलक शरद पवार यांचे चेले लावत आहेत. परंतु पंधरा वर्षे कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी कांद्यावर तोडगा का काढला नाही, असा सवालही त्यांनी केला. कांद्याचे निर्यातदार हे राष्ट्रवादीशी संबंधित असून, त्यांनी कांदा निर्यात केला तर कांद्याचे वाढलेले भाव केंद्र सरकारला अडचणीत आणतील या भीतीपोटी सरकारने कांदा आयात केला असे सांगून, सरकारने अगोदर कांदा आयात-निर्यातदारांचे परवाने रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. येत्या ११ सप्टेंबर रोजी खासदार राजू शेट्टी हे केंदीय कृषिमंत्री तसेच पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे खोत यांनी सांगितले. महायुतीतील शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जागावाटपाबाबत चर्चा केली असून, राज्यातील बारा जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. लवकरच भाजपाशी येत्या एक दोन दिवसात बोलणी होईल असा आशावाद व्यक्त करून, नाशिक जिल्'ातील चांदवड व सटाणा या दोन जागांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.