साधुग्राममध्ये शुकशुकाट
By admin | Published: September 26, 2015 10:44 PM2015-09-26T22:44:05+5:302015-09-26T22:49:45+5:30
मंडपांची आवरासावर : कपिला संगमावर भाविकांचा ओघ
नाशिक : साधुग्राममधील कपिला संगम वगळता सर्वत्र खालशांनी बस्तान गुंडाळल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे. ‘राम’नामाच्या गजराने गजबजणारे तपोवन शांत झाले आहे.
सेक्टर एक, दोनमधील सर्वच खालशांनी साहित्य आवरल्याने भाविकांची गजबज असणारे साधुग्राम ओस पडले आहे. मंडपाची आवरसावर करणाऱ्या कामगारांशिवाय दुसरे काही नजरेस सध्या पडत नाही. मंडपाचे साहित्य भरण्याचे काम कामगार करीत आहेत. खालशांतील साधू-महंतांचे भक्तगणही रवाना झाले आहेत. त्यामुळे भाविकांनी आता साधुग्रामकडे पाठ फिरवली आहे. साडेतीनशे हेक्टरमध्ये प्रशासनाने तपोवनात साधू-महंतांना सुविधा उपलब्ध केली होती. मात्र साधू-महंत, भक्तगण साहित्य घेऊन रवाना झाल्याने शौचालय व स्नानगृहाच्या पत्रे नजरेस पडत आहेत. परराज्यातून कपिला संगमावर दाखल होणारे भाविक आवर्जून साधुग्राममध्ये फेरफटका मारतात. त्यामुळे या भाविकांना खालशांच्या जागेवर कचऱ्याचे दर्शन होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. कपिला संगमावर लक्ष्मण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक कुतूहलाने रामसृष्टीत जातात. मात्र सेक्टर दोनमधील रामसृष्टीत सफाई न झाल्याने कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)