साधुग्राम फवारणीचा ठेका वर्षभराचा
By admin | Published: June 3, 2015 11:59 PM2015-06-03T23:59:43+5:302015-06-04T00:34:38+5:30
पालिकेचा प्रकार : तीन महिन्यांच्या कालावधीसाठी गरज; निविदांमधील तरतुदींमुळे संशय
नाशिक : वर्षभर सिंहस्थ कुंभमेळा असला तरी साधू-महंत हे नाशिकमध्ये अवघे तीन ते चार महिने साधुग्राममध्ये वास्तव्यास असतात. परंतु नाशिक महापालिकेने साधुग्राममध्ये वर्षभर अळीनाशक फवारणीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साधुग्राममध्ये साधूच नसतील किंबहुना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस साधुग्राम रिते होणार असताना अळीनाशकाची फवारणी नेमकी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कुंभमेळा तोंडावर असल्याने सध्या प्रशासन हातघाईवर आले असून, आवश्यक त्या कामांसाठी प्रक्रिया राबविण्याचीही घाई झाली आहे. तथापि, यामुळे संभ्रम पडावा अशी स्थिती आहे. गेल्याच आठवड्यात महापालिकेने रामवाडी पूल ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत टप्प्याटप्प्याने रंगरंगोटी आणि दुरुस्तीच्या कामाच्या निविदा मागविल्या होत्या; परंतु ज्या दिवशी निविदांसाठी वृत्तपत्रातून निविदा मागविण्यात आल्या त्याचवेळी रामकुंड परिसरात रंगरंगोटीची कामे सुरू होती. सदरचे काम प्रायोगिक तत्त्वावर असल्याचे पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे असले, तरी प्रायोगिक तत्त्वावर काम करावी इतकी रंगरंगोटीच्या कामांची घाई कशी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता असाच प्रश्न अळीनाशक थोडक्यात डास निर्मूलनाच्या ठेक्याविषयी निर्माण झाला आहे.
महापालिकेने बुधवारी काही वृत्तपत्रांतून जाहिराती देऊन निविदा मागवल्या आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी २०१५-१६ या वर्षाकरिता साधुग्रामच्या कार्यक्षेत्रात अळीनाशक फवारणी करण्याकरिता हायप्रेशर पंप असलेल्या मिनी ट्रॅक्टरद्वारे अळीनाशक फवारणी करणेकामी मनुष्यबळासह भाड्याने पुरवणे अशी महापालिकेची नोटीस असून, त्यासाठी आॅनलाइन निविदा मागविल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा १३ महिने असतो हे खरे असले, तरी साधुग्राम जेमतेम तीन ते चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नसते. अशा स्थितीत साधुग्राममध्ये वर्षभर अळीनाशके कशी फवारणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेत सध्या छोट्या कामांसाठीही निविदा मागवल्या जात आहेत. त्यामुळे कोटेशनच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला असला, तरी अशा प्रकारच्या निविदा मागवण्याआधीच काम सुरू करण्याच्या प्रकारामुळे पारदर्शकता कितपत यशस्वी ठरेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)