हॉर्न न वाजविता सुरक्षित वाहन चालवा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:18 AM2018-02-22T01:18:46+5:302018-02-22T01:19:11+5:30
आवश्यकता नसताना अतिप्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने व्यक्तीवर होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांच्या हॉर्न वाजविण्याच्या वृत्तीत बदल घडवून वाढते ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांपासून मुंबईसह प्रमुख शहरांत राज्याचे परिवहन विभागाचे प्रधान सचिव व परिवहन आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वतीने ‘कृपया हॉर्न नको’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
पंचवटी : आवश्यकता नसताना अतिप्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने व्यक्तीवर होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांच्या हॉर्न वाजविण्याच्या वृत्तीत बदल घडवून वाढते ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांपासून मुंबईसह प्रमुख शहरांत राज्याचे परिवहन विभागाचे प्रधान सचिव व परिवहन आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वतीने ‘कृपया हॉर्न नको’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या जनजागृतीचा भाग म्हणून नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने हॉर्न न वाजविता सुरक्षित वाहन चालविणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे. येत्या मार्च महिन्यात सोमवारी (दि. ५) सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नियमांची पूर्तता करणाºया १०० दुचाकी व १०० चारचाकी चालक स्पर्धक सहभागी होणार असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयातून या स्पर्धेचा शुभारंभ व समारोप करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नाशिक शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरून स्पर्धकांना १५ किलोमीटर वाहन चालवावे लागणार आहे. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. ३ मार्चपर्यंत टपालाद्वारे अर्ज करावा. स्पर्धेत सहभागी होणाºया स्पर्धकांनी वाहन चालविताना सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. याशिवाय लायसन्स, वाहनाची मूळ कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. हॉर्न न वाजविता सुरक्षित वाहन चालविणे स्पर्धेत वाहनधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कळसकर यांनी केले आहे.
पारितोषिके देणार
या स्पर्धेवर परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी नियंत्रक म्हणून राहतील. स्पर्धेदरम्यान वाहन चालविताना वाहनचालकाची हॉर्न वाजविण्याची पद्धत, वाहनावरील नियंत्रण आणि स्पर्धेदरम्यान वाहनचालकाने कितीवेळा हॉर्न वाजविला याची नोंद ठेवण्यात येणार आहे. या नोंदीच्या आधारे दुचाकी व चारचाकी संवर्गातून तीन क्रमांक निवडण्यात येऊन प्रायोजकांमार्फत रोख पारितोषिके देण्यात येतील, तर स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना नो हाँकिंग लोगो असलेली टोपी व टी शर्ट भेट देण्यात येणार आहे.