सहाब, हमारे बच्चे हमें लौटा दिजीयें; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारच्या 'त्या' मुलांच्या पालकांचे साकडे
By अझहर शेख | Published: June 12, 2023 03:06 PM2023-06-12T15:06:04+5:302023-06-12T15:06:15+5:30
नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व ...
नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाडमध्ये रेस्क्यू केले होते. या मुलांच्या पालका मागील दहा दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांच्या मुलांना घेण्यासाठी आले आहेत; मात्र सरकारी यंंत्रणांकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सोमवारी (दि१२) या गोरगरीब पालकांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., यांची भेट घेतली. ‘सहाब, हमारे बच्चे हमें वापस लौटा दिजीयें...’ असे साकडे त्यांना घातले.
मानवी तस्करीच्या संशयातून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाड या दोन रेल्वे स्थानकावर मागील आठवड्यात कारवाई केली होती. या मुलांना बिहारमधून सांगलीला घेऊन जाणाऱ्या दोन मौलनांनांही अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर या सर्व मुलांना नाशिक व भुसावळच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत जेव्हा ही बातमी माध्यमांद्वारे पोहचली, तेव्हा त्यांनी थेट रेल्वेतून भुसावळ व मनमाड गाठले. मागील दहा दिवसांपासून सुमारे दहा ते बारा बिहारचे नागरिक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. बिहारच्या रेल्वे स्थानकाद्वारे त्या सर्व मुलांचे आरक्षण तिकिटदेखील आहेत, असे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, हिंद मुस्लीम हक सुरक्षा व विकास महासमितीचे अंजुम मकरानी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांच्यासह मुलांच्य पालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेतली. सर्व ५९ मुलांना तातडीने त्यांच्या पालकांकडे सोपवावेत अशी मागणी केली. या मुलांचा कुठलाही दोष नाही, किंवा ते गुन्हेगारही नाही, मग त्यांना अन्यायकारक वागणूक का दिली जात आहे? असा सवालही उपस्थित केला. दुसऱ्यांदा या शिष्टमंडळाकडून त्यांना निवेदन देण्यात आले.