दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 09:14 PM2021-02-16T21:14:03+5:302021-02-17T00:27:04+5:30
दाभाडी : येथील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत ...
दाभाडी : येथील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दाभाडी ग्रामपंचायतीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व हिरे यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत होऊन हिरे गटाने बाजी मारत ग्रामपंचायत दाभाडीत लोकनियुक्त सरपंचासह बहुमताने दहा सदस्य निवडून आणत सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यानंतर लोकनियुक्त सरपंच निकम यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवत सत्ताधारी हिरे गटाचे आठ सदस्य आणि विरोधी पक्षातील सेनेचे सहा सदस्य यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करत ग्रामसभेत बहुमताने पारित केला होता. यामुळे पुढील काळात ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता राहील, याबाबत ग्रामस्थांसह तालुक्यात मोठी चर्चा होत होती. मात्र, आता ग्रामपंचायतीतील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अविनाश निकम, आशाबाई निकम, अक्काबाई सोनवणे, अंताजी गायकवाड, सुनीता गायकवाड तसेच पंचायत समिती सदस्य कमळाबाई मोरे यांचे पती वसंत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी प्रमोद निकम, नीळकंठ निकम, शरद देवरे, अशोक निकम, निरंकार निकम, दादाजी सुपारे, वैभव मानकर उपस्थित होते. आता दाभाडी ग्रामपंचायतीत सतरा सदस्यांपैकी बारा सदस्य शिवसेनेचे झाल्याने पुढील राजकीय दिशा बदलणार आहे तर दुसरीकडे हिरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पुढील काळात दाभाडी ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.