प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 06:58 PM2021-02-08T18:58:36+5:302021-02-09T00:47:33+5:30
सायखेडा : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक सहविचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष आर.के खैरनार, अर्जुन ताकाटे, प्रदीप शिंदे, धनराज वाणी उपस्थित होते.
यावेळी संघाचे दिवंगत नेते कै.दौलत पुंजाजी वाटपाडे व र.ग. कर्णिक यांना श्रध्दाजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक तालुका अध्यक्षाने आपल्या तालुक्यातील समस्या मांडल्या. त्यांची नोंद जिल्हा संघाने घेतली. यात पगार, निवड श्रेणी, फंड प्रकरणे, चट्टोपाध्याय, अंशदायी पेन्शन योजना इत्यादी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या पतसंस्था निवडणुकीबाबत संघटनेशी प्रामाणिक असणाऱ्यानाच उमेदवारी देण्यात यावी यासंदर्भात तालुका संघाने निर्णय घ्यावा, जिल्हा संघ हस्तक्षेप करणार नाही मात्र सत्ता टिकून ठेवा अशा सूचना देण्यात आल्या. इगतपुरी,नांदगाव, देवळा, कळवण इत्यादी तालुक्याचे अधिवेशन घेण्यात येईल तालुका कार्यकारिणीचे पद रिक्त झाले असल्यास ते तालुका मिटिंग घेऊन तालुका संघाने भरून घ्यावेत तसे अधिकार देण्यात आले, मात्र जिल्हा संघातील रिक्त पद जिल्हा अधिवेशनानंतर भरण्यात येतील, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक अर्जुन ताकाटे यांनी केले तर सूत्रसंचालन निंबा बोरसे यांनी केले.