साहेब, शेतकरी जगणार कसा?

By admin | Published: June 24, 2014 08:49 PM2014-06-24T20:49:10+5:302014-06-25T00:14:57+5:30

शेतकरी संतप्त : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Saheb, how will a farmer live? | साहेब, शेतकरी जगणार कसा?

साहेब, शेतकरी जगणार कसा?

Next



नाशिक : जिल्हा बॅँकेचे जिल्'ात थकबाकीदारांकडे कोट्यवधी रुपये थकीत असताना, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शेतकऱ्यांवर थेट जप्ती कारवाई करताना दारापुढील ट्रॅक्टर ओढून नेला जातो. गारपिटीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान केलेले असताना, बॅँकेने थकबाकीदार ठरवून पीककर्ज देण्यास नकार दिल्याने अस्मानी संक ट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करीत बॅँकेने तत्काळ जप्ती मोहीम थांबवावी अन् अडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज मंजूर करण्याची मागणी करीत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात यामुळे वातावरण अधिकच तापले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कांद्याचे निर्यात मूल्य, जिल्हा बॅँकेची जप्ती मोहीम, कृषी विभागाकडून विलंबाने होणारे पंचनामे यांसह विविध मागण्यांसंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान जिल्हा बॅँक व कृषी अधिकाऱ्यांना पाचारण न केल्यास कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रारंभी कठोर भूमिका घेत आंदोलनाची ही रीत नसल्याचे खडसावले. तरीही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी लावून धरल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले. यादरम्यान शेतकऱ्यांनी कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणावे, बॅँकेच्या जप्ती मोहिमेमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्येची वेळ आली आहे, तर गारपिटीचे पंचनामे करताना कृषी अधिकारी आणि तलाठ्यांकडून दिरंगाई करण्यात येत असल्याच्या तक्रारी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गारपिटीमुळे कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाल्याने ते उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता त्यांनी, कांद्यासाठी शेतकरीच ९० टक्के बियाणे तयार करीत असतो, तर कंपन्यांकडे दहा टक्के बियाणे असते. सद्यस्थितीतही कंपन्यांकडे तेवढेच बियाणे असले, तरी किमान २५०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी विक्रेत्याबाबत लेखी तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल; परंतु शेतकरी लेखीऐवजी तोंडीच तक्रारी करीत असल्याबद्दल पन्हाळे यांनी खंत व्यक्त केली.
जिल्हा बॅँकेकडून होणाऱ्या जप्ती मोहिमेवरून संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बॅँकेचे प्रशासकीय व कृषी व्यवस्थापक सुदाम देवरे यांना धारेवर धरत मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी नासाकावरील कारवाईचे उदाहरण देत इतरांवर कारवाई सुरू असल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर कोणती कारवाई केली याची विचारणा केली. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरचे हप्ते आठ-दहा वर्षांपासून थकीत आहेत त्यांच्यावर कारवाई केल्याचे देवरे यांनी सांगत, पीककर्जाचेही थकीत व्याज जरी शेतकऱ्यांनी अदा केले तरी त्यांना पुढील पीककर्ज देता येऊ शकेल. तसे न करताच थकीत असताना नव्याने कर्ज देण्यास शासनानेच विरोध केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी बॅँकेकडे निवेदन द्यावे, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे देवरे यांनी सांगितल्यानंतर शेतकरी शांत झाले. सदरच्या चर्चेमध्ये स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक पगार, संजय देवरे, बापू जाधव, शिवाजी राजोळे आदिंनी सहभाग घेतला. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता.

‘त्या’ तलाठ्यावर कारवाईचे आदेश
चर्चेदरम्यान संजय देवरे या शेतकऱ्याने लखमापूर (ता. सटाणा) येथील तलाठ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असून, पंचनाम्यांवर स्वाक्षरी न देताच दादागिरीची व अर्वाच्य भाषा वापरीत असल्याची तक्रार केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी तातडीने तहसीलदारांशी संपर्क साधून ‘नागरे’नामक तलाठ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Web Title: Saheb, how will a farmer live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.