साहेब दौऱ्यावर, तर कुणी रजेवर
By admin | Published: April 7, 2017 01:47 AM2017-04-07T01:47:14+5:302017-04-07T01:47:25+5:30
नाशिक : आदिवासींच्या सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य, विभागीय आणि जिल्हा कार्यालयांमध्ये इतर शासकीय कामांपेक्षा वेगळी परिस्थिती नाही
नाशिक : आदिवासींच्या सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य, विभागीय आणि जिल्हा कार्यालयांमध्ये इतर शासकीय कामांपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कर्मचारी आपल्याच वेळेनुसार काम करीत असल्याचे आढळून आले. ‘एक दिवस शासकीय कार्यालयात’ या उपक्रमांतर्गत प्रस्तुत प्रतिनिधीने आदिवासी विकास भवन येथे भेट देऊन अवलोकन केले असता. कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे सजविलेल्या कार्यालयात मात्र काम करण्याची मानसिकता दिसून आली नाही. जिल्हाभरातून अभ्यागत भेटण्यासाठी आलेले असताना साहेब दौऱ्यावर गेले, साहेब बाहेर गेले आहेत... जरा वेळ बसा.. साहेब आता येतीलच, असेच उत्तरे कार्यालयात येणाऱ्यांना मिळाली.
आदिवासी आयुक्तआणि उपायुक्त कार्यालयात हजर असले तरी किरकोळ परंतु महत्त्वाची कामे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर आहेत, ते कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसले. शिपायांचा रुबाब येथेही दिसून आला.
विभागीय आयुक्त कार्यालयात तर रिसेप्शनवर नेमके कोण आहेत हेच कळत नव्हते. एकापेक्षा अधिक लोक येथे गप्पा हाणत होते. त्यामुळे रिसेप्शनिस्ट कोण आणि शिपाई कोण असाच प्रश्न निर्माण होतो. कार्यालयात जाताना प्रत्येक ठिकाणी नोंद होते आणि नोंद घेणाऱ्यालाच सर्व हकिकत सांगावी लागते. बाहेर सांगितलेली कथा पुन्हा मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगावी लागते. त्यामुळे इतक्या चौकशा कशासाठी, असा सवाल कार्यालयात आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. (प्रतिनिधी)