साहित्य संंमेलन कार्यालयाचे आज महापौरांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:14 AM2021-01-22T04:14:19+5:302021-01-22T04:14:19+5:30
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठीच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर ...
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठीच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी आता अवघे दोनच महिने शिल्लक असल्याने संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग देण्यासाठी गोएसो कॅम्पसमधील फार्मसी कॉलेज इमारतीत या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच महापौरांनी संमेलनस्थळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. तसेच संमेलनासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर महापौरांच्या हस्ते आज कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकला संमेलन निश्चित झाल्यापासूनच गोएसो परिसरातील काही अनावश्यक आणि जीर्ण इमारती, डीपी तसेच कॅन्टीनसह काही अन्य इमारती हटविण्याच्या कामकाजाला वेग देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत गोएसो कॅम्पसमधील उंच-सखल भागांचे सपाटीकरण करुन पार्किंगच्या जागेसाठी विस्तारदेखील करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असल्याचे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.