काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:19 AM2018-05-14T00:19:44+5:302018-05-14T00:19:44+5:30

सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे.

Sahyadri to light up with lightning | काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

काजव्यांच्या प्रकाशात उजळणार सह्याद्री

googlenewsNext

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृद्ध वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासना करत आहे. या जैवविविधतेमध्ये काजवा या कीटकाच्या जोपासनेमुळे या अभयारण्याने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. काजवारूपी प्रकाशफुलांच्या आविष्कारासाठी हे अभयारण्य राज्यात प्रसिद्ध आहे. चालू महिन्याच्या पंधरवड्यानंतर हा आविष्कार अभयारण्यातील वृक्षसंपदेवर बघावयास मिळणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना याचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.  वैशाख सरू झाला की या अभयारण्यामधील भंडारदरा ते राजूरपर्यंतच्या परिसरातील वातावरण बदलू लागते अन् मग निसर्गप्रेमींना चाहूल लागते ती सह्याद्रीच्या गिरिकंदात झगमणाऱ्या काजव्यांच्या दुनियेचे. वैशाखनंतर काजव्यांच्या उत्पत्तीचा काळ जवळ येतो. रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये काजवे चमकू लागतात. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील घाटघर-साम्रद व भंडारदरा-रतनवाडी या मार्गांवर काजव्यांची दुनिया पाहावयास मिळते. हा परिसर इगतपुरी व नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबईकर, नाशिककर तसेच पुणेकरांनाही संगमनेर-राजूरमार्गे हे अभयारण्य सोयिस्कर पडते. रोहिणी किंवा मृगाच्या सरी बरसल्या की जणू नभोमंडळातील तारकादळेच अभयारण्याच्या कुशीत उतरल्याचा भास होतो. चहुबाजूला विविध प्रजातीच्या झाडांवर काळ्याकुट्ट अंधारात काजव्यारूपी प्रकाशफुलांचा लखलखाट पाहावयास मिळतो. निसर्गाची ही अद्भुत किमया केवळ डोळ्यांच्या कॅमेºयात टिपता येते आणि या प्रकाशफुलांनी उजळलेले झाड डोळ्यांनी न्याहाळण्याची मजा काही औरच असते. दरवर्षी अभयारण्यात ही दुनिया अनुभवण्यासाठी महिनाभर निसर्गप्रेमींची वर्दळ पाहावयास मिळते. मुंबईकरांसह नाशिककर, पुणेकर व नगरकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या भागातील आदिवासी लोकांना रोजगारदेखील काही प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते. लक्ष-लक्ष काजव्यांचा नैसर्गिक आविष्कार डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो; मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे डोळे जणू हा आविष्कार बघून विस्फारतात की काय, अशी शंका येते. अशा विकृतांकडून असा अद्भुत नजारा अनुभवला तर जात नाही मात्र तो नजारा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी अशा विकृ त प्रवृत्तीच्या लोकांवर नाशिक वन्यजीव विभागाचा ‘वॉच’ राहणार आहे. ग्रामस्थ व गाइडच्या मदतीने वनविभाग पर्यटकांच्या धिंगाण्याला चाप लावणार आहे.
पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावे
चारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारून काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करून पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखलेली झाडे बघण्याची मजा लुटावी, असे आवाहन भंडारदरा, अकोले विभागातील निसर्गप्रेमींसह नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी केले आहे.

Web Title: Sahyadri to light up with lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल