‘सिडको’च्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:00 AM2017-07-31T01:00:52+5:302017-07-31T01:01:02+5:30
सिडको परिसरातील मदरसा नुरूल-ए-हुदा या विश्वस्त संस्थेने १९९४ साली खरेदी केलेले दोन भुखंड अद्याप विकसित केले नाही, हे कारण दाखवून सिडकोने संबंधित संस्थेला तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिडको परिसरातील मदरसा नुरूल-ए-हुदा या विश्वस्त संस्थेने १९९४ साली खरेदी केलेले दोन भुखंड अद्याप विकसित केले नाही, हे कारण दाखवून सिडकोने संबंधित संस्थेला तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे २००३ साली सिडको प्रशासकांनी भुखंडांवर सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देत पुढील आदेशाची प्रतीक्षा करण्याचे पत्र संस्थेला दिले होते. सदर प्रकार शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत दंडाची रक्कम रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. दोन महिन्यांपूर्वी भूखंड विकास केला नसल्याचे कारण दाखवून संबंधितांना सुमारे वीस लाखांचा दंडाची नोटीस सिडको प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. मुस्लीम धार्मिक सार्वजनिक संस्था म्हणून नोंदणी केलेल्या मदरसा नुरूल हुदा या संस्थेवर करण्यात आलेली दंडात्मक कारवाई बेकायदेशीर असल्याचे फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सिडको प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत संस्थेने २००३पासून बांधकाम स्थगित केले. त्यामुळे दोन भुखंडांचा विकास होऊ शक ला नाही; मात्र प्रशासनाने सदर आदेशाकडे डोळेझाक करीत ‘सिडको’च्या भुखंड विकासाबाबतच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी सुमारे वीस लाखांचा दंड ठोठावला आहे.
या बाबीकडे निवेदनाद्वारे फडणवीस यांचे लक्ष रविवारी (दि.३०) मेळा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी वेधण्यात आले. यावेळी सुन्नी मरकजी सीरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार, खतीब हिसामुद्दीन अशरफी, नुरूल हुदाचे विश्वस्त हाजी लतीफ, साजीद पटेल, मोईन शेख, सादिक शेख, मुश्ताक इनामदार आदि उपस्थित होते.
‘वक्फ बोर्ड’सक्षम करा
औरंगाबाद वक्फ मंडळाच्या कार्यालयातील कामकाज अधिकाधिक सक्षम व पारदर्शक करत प्रलंबित दावे निकाली काढण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, मीर मुख्तार अशरफी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच वडाळागाव परिसरात उभारण्यात येणाºया महापालिकेच्या रुग्णालयाला विशेष निधी देऊन त्वरित लोकार्पण करावे, असेही फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.