सराईत बालगुन्हेगार ‘पाप्या’चा खून
By admin | Published: February 8, 2017 01:11 AM2017-02-08T01:11:11+5:302017-02-08T01:11:23+5:30
पेठरोडवरील घटना : शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग
पंचवटी : परिसरात दहशत माजवून कधी प्राणघातक हल्ला, तर कधी खून, हाणामारी, लूटमार, मोबाइलची चोरी या प्रकरणांत पोलीस रडारवर असलेला पेठरोडवरील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल (१६) याचा तिघा अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी भरदिवसा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळील हिरे फरसाणजवळ घडली आहे. दरम्यान, या खुनातील तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत पंचवटी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेतील मयत पाप्या व तिघे शाळकरी विद्यार्थी यांच्यात काहीतरी वाद झाला होता व या वादातून पाप्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत माहिती अशी की, पाप्या शेरगिल हा दुपारी ३ वाजेला पेठरोडवरील मोतीसुपर मार्केट इमारत जवळील हिरे फरसाणजवळ उभा असताना परिसरातच राहणाऱ्या तिघा अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी बेसावध असलेल्या पाप्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत पाप्या खाली कोसळल्यानंतर तिघा अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पाप्याला परिसरातील एका रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणी पाप्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. (वार्ताहर)