सामाजिक एकतेसाठी संतांचे योगदान : टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:51 AM2018-12-23T00:51:03+5:302018-12-23T00:51:55+5:30
महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़
नाशिक : महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ संतांचे विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी व्यक्त केले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य सभागृहात प्रमिला मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित २४व्या मिरजकर स्मृती सोहळ्यात ‘संतांची बंडखोरी’ या विषयावर ते बोलत होते़
टिळक पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी कधीही मी असा भाव न धरल्याने ते मोठे कार्य करू शकले़ समाजातील अनेक क्षेत्रांमधील आजही संतांसारखी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याने या क्षेत्राचा व संस्थांचा विकास होतो आहे़ समाजाचे संस्थांकरण हे महत्त्वाचे कार्य प्रारंभी संतांनीच केले़ धर्म, वंश जात यामध्ये भेदभाव केला जाऊ नये यासाठी संत आणि संस्था यांचे कार्य मोलाचे होते़ राज्यातील अनेक चळवळी या संतांशी निगडित असून समतेची चळवळ ही महात्मा फुले यांच्याशी तर प्रार्थना समाज ही न्या. रानडे यांची चळवळ भागवत परंपरेशी तर शाहू महाराजांच्या चळवळीचा प्रवास पुन्हा समतेकडे जातो़ महाराष्ट्राच्या विकासासाठी आजही या चळवळींचे कार्य आवश्यक असल्याचे टिळक यांनी सांगितले. यावेळी अभय टिळक व मान्यवरांच्या हस्ते कॉलेजरोडवर गत ३०-३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे फॅमिली डॉक्टर डॉ. मोहन टेंबे, त्र्यंबकेश्वर येथील वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबक (बाळासाहेब) भास्कर दीक्षित शास्त्री व ज्येष्ठ विधीज्ज्ञ सुहास मिसर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
रुग्णाचे शरीर व मनाचे फॅमिली डॉक्टरला ज्ञान
रुग्णाचे केवळ शरीरच नव्हे तर मनाचाही ठाव ज्या डॉक्टरांना कळतो तेच खरे फॅमिली डॉक्टर होय अशी व्याख्या टिळक यांनी सांगितली़ अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या युगात प्रामाणिक, निष्ठावान डॉक्टर आहेत़ मात्र, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद हरवत चालला असून हा संवाद वाढविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे टिळक म्हणाले़