विश्व हिंदू परिषदेचे नाशकात संत संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:42 AM2018-11-26T00:42:44+5:302018-11-26T00:43:14+5:30
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नाशिक येथे शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी देशभरातील संत-महंताचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी या संमेलनात विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिली.
नाशिक : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नाशिक येथे शनिवार, दि. ८ डिसेंबर रोजी देशभरातील संत-महंताचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी या संमेलनात विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिली.
गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलात रविवारी (दि. २५) आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, शेकडो वर्ष झाली तरी श्रीराम जन्मभूमीसाठी हिंदू समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. या प्रश्नावर विचारमंथन व्हावे यासाठी नाशिक शहरात देशभरातील संत-महंताचे संमेलन दि. ८ डिसेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी गंगाघाटावर श्रीरामच्या प्रतिमेची महारांगोळी साकारण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या संत संमेलनाला विहिंपचे संघटनमंत्री विनायक देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. त्याप्रमाणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.
तसेच माधव महाराज घुले, सद्गुरू जंगलीदास महाराज, शांतीगिरी महाराज, माधवगिरी महाराज, सागरानंद सरस्वती, महंत किशोरदास शास्त्री, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास, डॉ. बिंदू महाराज, योगी भाईनाथ महाराज, सोमेश्वरानंद महाराज, रामकृष्णदास लहवितकर, देवबाप्पा महाराज, नरसिंहकृपा प्रभू आदी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस गणेश सपकाळ, विनोद थोरात, कैलास देशमुख, डॉ. निरंजन नंदन, आदींसह विहिंप, बजरंग दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.