संत साहित्य, अध्यात्माचा अभ्यासक हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:39 AM2019-03-28T00:39:21+5:302019-03-28T00:39:38+5:30
आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
नाशिक : आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
सावानाच्या वा. गो. कुलकर्णी कलादालनात बुधवारी (दि.२७) यशवंत पाठक यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी त्यांचे बंधू कवी किशोर पाठक, सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते. अध्यात्म आणि संतसाहित्य हे पाठक यांचे जीव की प्राण होते. संत साहित्याला दिशा देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. तसेच लोकांना अध्यात्माचे महत्त्व समजावे, यासाठी विविध व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले, अशा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाल्या.
माझ्या आत्मचरित्रात त्यांच्या अनेक आठवणी मांडल्या आहेत. त्यांचे बोलणे रसाळ-मधुर होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे संतसाहित्य पोरके झाले आहे, असे डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी यावेळी सांगितले. अध्यात्माची बाजू त्यांनी अत्यंत दमदारपणे मांडल्याचे पुरुषोत्तम सावंत यांनी सांगितले. पाठक यांच्यासोबत खूप काम केले. आम्ही एमएपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. अनेक विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्याशी संवाद म्हणजे एक मेजवानीच असायची. त्यांच्या जाण्याने संत साहित्याची हानी झाल्याची भावना श्रीकृष्ण सिन्नरकर यांनी व्यक्त केली. शलाका सावंत, प्राचार्य वेदश्री थिगळे, रमेश कडलग, सुभाष सबनीस, माधवराव भणगे, विठ्ठल देशपांडे, चंद्रकांत खासे, अॅड. भानुदास शौचे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. उल्हास रत्नपारखी यांनीही श्रद्धांजली वाहिली. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.