शिवसेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:05 AM2017-07-26T01:05:36+5:302017-07-26T01:05:50+5:30
नाशिक : गेल्या आठवड्यात रस्ते विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत समृद्धी महामार्गात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता शिवसेनेने या मार्गात बदल करण्याच्या केलेल्या सूचनेचा विचार करून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सिन्नर व इगतपुरी तालुक्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यातून फक्त सेनेची समजूत काढण्याचाच प्रयत्न केला जाणार असून, गेल्या आठवड्यात रस्ते विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत समृद्धी महामार्गात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी प्रशासकीय पातळीवर हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात असले तरी, या प्रकल्पाला जागोजागी होणारा शेतकऱ्यांचा विरोध तसेच राजकीय पक्षांच्या भूमिकेचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. विशेष करून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने समृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी न देण्याची भूमिका घेतल्यामुळे बागायतदार शेतकरी अद्यापही जागा देण्यास पुढे येत नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या मार्गात बदल करण्याची सूचना मध्यंतरी राज्य सरकारला केली होती व त्यासाठी काही नकाशेही राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर केले होते. विशेष करून नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी येथील शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता इगतपुरी तालुक्यातील फागुलगव्हाण, सायाळे या डोंगरमाथ्यावरून नवीन मार्ग शिवसेना कार्याध्यक्षांनी सुचविला आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत रस्ते विकास महामंडळाची बैठक होऊन त्यात ठाकरे यांनी सुचविलेल्या मार्गाची व्यावहारिकता तपासून पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, प्राथमिक पातळीवर ठाकरे यांनी सुचविलेला मार्ग पूर्णत: डोंगर-दऱ्यातून जात असून, त्यातून शेतकरी बाधित होणार नाहीत हे जरी खरे असले तरी, तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे मत त्याच बैठकीत व्यक्त करण्यात आले, परंतु त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच बैठकीत रस्ते विकास महामंडळाने मात्र समृद्धी महामार्गाच्या नकाशात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष न देता मूळ मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही केल्या आहेत.
शेतकऱ्यांकडून चौकशी
समृद्धी महामार्गासाठी दर जाहीर झाल्याने जमिनीची खरेदी दिल्यास गटनिहाय किती पैसे मिळतील याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची समृद्धी कार्यालयात गर्दी होऊ लागली असून,येत्या आठवड्यात काही व्यवहार होण्याची शक्यता आहे.