शिवसंपर्काची आरंभशूरता न ठरो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:43 AM2017-07-28T00:43:33+5:302017-07-28T00:43:52+5:30
शिवसैनिकांचा सवाल : पहिलाच दिवस सुनासुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्लंबर शोधण्याची गरज पडणार नाही, फोन केल्यास तो घरापर्यंत पोहोचेल. कार्यालय हायटेक होईल, एका क्लिकसरशी सेनेचा इतिहास, पदाधिकारी, सैनिकांची माहिती डोळ्यासमोर उभी राहील, प्रत्येक विभागात संपर्क कार्यालयाची निर्मिती करून विभाग पातळीवरच जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल अशा एक नव्हे तर जवळपास डझनभर राजकीय थाटात घोषणा केल्यानंतर त्याचा सोयीस्कर विसर पाडून घेतलेल्या शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्याचा सोडलेला संकल्प पहिल्याच दिवशी बारगळला. मुंबईत शिवसैनिकांमध्ये लोकोपयोगी उपक्रमांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याची चढाओढ लागलेली असताना नाशकात मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने गटबाजीचेच प्रदर्शन दिसून आले.
शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम वा उपक्रम असो तो यशस्वी करण्यासाठी सैनिकांमध्ये जो सळसळता उत्साह असतो त्याला अन्य राजकीय पक्षात तोड नाही. मातोश्रीने आदेश दिला तर तो शिरसावंद्य मानून पूर्ण करण्यासाठी स्वत:ला झोकून देण्याची सैनिकाची ही वास्तवता कोणताही राजकीय पक्ष नाकारत नसला तरी, एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात ही वास्तवता लोप पावते की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होय. यापूर्वी शिवसेनेचा स्थापना दिवस असो वा पक्षप्रमुखांचा वाढदिवस, शिवसैनिकांकडून विभागनिहाय व शाखानिहाय लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत होते, दिवसभर अशा कार्यक्रमांमध्ये पक्षाचे पदाधिकाऱ्यांनाही मिरविले जात होते; मात्र यंदा पहिल्यांदाच शहर व जिल्हा शिवसेनेत कार्यक्रमांचा अभाव दिसला, तो दिसेल याची जाणीव अगोदरच झाली की काय म्हणून पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या छायाचित्रांतून गटबाजीचे प्रदर्शनपक्षप्रमुख ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर, जिल्ह्यात करण्यात आलेल्या होर्डिंग्ज व जाहिरातींमधून प्रत्येकाने ठाकरे यांना आपल्या वैयक्तिक शुभेच्छा देताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे हेतुपुरस्सर टाळले आहेत. काही ठिकाणी जिल्हा व महानगरप्रमुखांचे छायाचित्रेच नसल्याने एकप्रकारे त्यांचे नेतृत्वच अमान्य केल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे दिसल्याने पक्षातील गटबाजी अद्यापही कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.