रेल्वे थांबे वाढविण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 08:58 PM2021-01-16T20:58:36+5:302021-01-17T00:46:21+5:30
लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची ...
लासलगाव : कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन सेवा सोडता, सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन फक्त कोविड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोविडच्या चाचण्या करून फिजिकल डिस्टन्स ठेवूनच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठरावीक ठिकाणीच कोविड स्पेशल रेल्वेचा थांबा असल्याने, अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नसल्याने, प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ.भारती पवार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचेशी नासिक रोड येथील स्थानकात बैठकीदरम्यान चर्चा केली.
या चर्चेदरम्यान नांदगाव येथे प्रवाशांची व पासधारक प्रवासी व यात्रेकरू यांची वाढती संख्या लक्षात घेता, या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेचा थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल, तसेच मनमाड, नासिक ते मुंबई येथे प्रवास करणारे अनेक चाकरमानी नोकरीच्या निमित्ताने आपल्या कार्यालयात रोज जाऊन येऊन नोकरी करतात. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची अडचण लक्षात घेता, त्यांच्यासाठी गोदावरी एक्स्प्रेस सुरू करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वेळेवर पोहोचता येईल, तसेच मनमाड रेल्वे स्टेशन हे रेल्वे जंक्शन आहे आणि धुळे, नगर जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तथा चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव या आसपासच्या परिसरातील जनतेलाही देशभरात अनेक ठिकाणी जाण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकावरून सुविधा उपलब्ध आहे, परंतु रेल्वेसेवा बंद असल्याने, त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत, त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या या बैठकीप्रसंगी खा.डॉ.भारती पवार यांनी मांडल्या. या बैठकीप्रसंगी विवेक गुप्ता, युवराज पाटील यांच्यासह अनेक रेल्वे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मनमाड स्थानकातील कामे संथगतीने
मनमाड मोठे रेल्वे जंक्शन असून, तेथे मोठा गुरुद्वारा असल्याने त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, देशभरातून अनेक भाविक या गुरुद्वारास भेट देण्यासाठी येत असतात. मनमाड शहराचाही विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. मनमाडची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील रेल्वे रुग्णव्यवस्था अधिक चांगली व्हावी, अधिकच्या रुग्णसुविधा रुग्णांना मिळाव्या व रेल्वे स्थानकाचेही आधुनिकीकरण व्हावे, यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मनमाड रेल्वे स्थानकात जी विकासकामे चालू आहेत, ती अतिशय संथ गतीने चालू आहेत, त्याही कामास गती मिळावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.