एमआयडीसी ते संगमनेर नाका चौपदरीकरणासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:18+5:302021-03-18T04:14:18+5:30
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत वसली आहे. एम.आय.डी.सी. परिसरात अरुंद रस्त्यामुळे नियमित वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण ...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत वसली आहे. एम.आय.डी.सी. परिसरात अरुंद रस्त्यामुळे नियमित वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षात या तीन किलोमीटरच्या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले असून, काहींनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे सिन्नर - शिर्डी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील या तीन किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण करून दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी येथील कारखानदार, तसेच वाहनचालकासह तमाम सिन्नरवासीयांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली होती. यापूर्वी काही शिष्टमंडळांनीदेखील खासदार गोडसे यांची भेट घेत याबाबत मागणीचे निवेदन दिले होते.
नागरिकांची तसेच कारखानदार, वाहनचालक यांच्या मागणीची गंभीर दखल घेत, खासदार गोडसे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सिन्नर - शिर्डी मार्गावरील तीन किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण करून दुभाजक टाकण्याची आग्रही मागणी केली. या महामार्गाबाबत लवकर केंद्राकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिले. याशिवाय सिन्नर शहराबाहेरुन शिर्डी महामार्ग व नाशिक-पुणे महामार्ग जात आहे. या दोन रस्त्यांना जोडणारा सिन्नर ते गुरेवाडी फाटा या सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचेही चौपदरीकरणाची मागणी करण्यात आली.
चौकट-
‘शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव एम.आय.डी.सी. ते संगमनेर नाका दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण करून दुभाजक टाकण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी केली आहे. लवकर याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्राकडून आश्वासन मिळाले आहे.
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.